पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रमाणात बुद्धी दिली, त्या प्रमाणात सौंदर्य मात्र दिले नाही. निसर्गातील नाना रंगांतील फुले, पाने, पक्षी, प्राणी, त्यांचे लोभसवाणे दर्शन या विधानाची साक्ष पटवितात. कपडे, कर्णभूषणे, पादत्राणे, तेल, साबण, कंगवा, नेलकटर... यांसारख्या सौंदर्यप्रसाधनांच्या (हो! सौंदर्यवृद्धीला हातभार लावणाऱ्या साऱ्या वस्तू!!) गैरहजेरीत माणूस हा पृथ्वीवरील एक बेढब प्राणी ठरावा. माणसाने निसर्गाकडून मिळालेल्या बुद्धीचा वापर केला आणि बेढब दिसणाऱ्या शरीराला नटविले, सजविले, धजविले. आजकाल अनेक समारंभात आपले शरीर कमीत कमी लपविण्याचा प्रयत्न केला जातो हा भाग वेगळा. अनेक प्रकारच्या आभूषणांच्या मदतीने बुद्धीबरोबर सौंदर्यातही त्याने मानवेतर प्राण्यांच्या पुढे बाजी मारली. स्त्री आणि पुरुष भेद करावयाचा झाल्यास विविध सौंदर्याभूषणांचा वापर पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अनेक पटींनी होताना दिसतो. सौंदर्य...! सौंदर्य म्हटले की, आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या जगाच्या बाजारात ( की बाजारी जगात?) डोळ्यांसमोर फक्त 'शरीराचे सौंदर्य उभे राहते. आजच्या पुरुषी वर्चस्वाच्या युगात स्त्रियांचा, स्त्रियांच्या सौंदर्याचा राजरोस व्यापार मांडला जातो. तो आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो. स्त्रियांचे सौंदर्य खुलविणे, त्यांना महत्त्व देणे या उदात्त (?) हेतूने या बाजारात ज्या अनेक क्लृप्त्या लढविल्या जातात, त्यांत बळी पडतो तो सामान्य-मध्यमवर्गीय माणूस. स्त्रीसौंदर्याच्या मुक्त दर्शनाने एक विशिष्ट पुरुषवर्ग मोहित होतो. उन्मत्त होतो. फाजील होतो. रमतो... खिन्नही होतो. सौंदर्याच्या बाजाराचा परिणाम आजकालच्या मुलींवर होतो. त्याही सौंदर्यवतींचे काही अंशी अनुकरण करतात. अनुकरण करताना त्या विसरतात की, आपण ज्या समाजात राहतो तो समाज संपूर्णत: निरोगी नाही. समाजात वावरणाऱ्या उन्मत्त टवाळखोरांच्या एकतर्फी प्रेमाची, प्रेम हा शब्ददेखील उच्चारण्याची ज्यांची पात्रता नसते अशा निर्दयी निर्ढावलेल्या नरांची, त्या शिकार बनतात. ६० । जगण्यात अर्थ आहे..