पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाईट प्रवृत्ती मोहक रूप धारण करू शकते. प्रत्येक सुंदर गोष्टीत नीती असतेच असे नाही. उपयुक्तता असतेच असे नाही. म्हणून सौंदर्याच्या मागे धावण्यापेक्षा चांगल्याच्या मागे धावावे. सत्याची कास धरावी. नीतीने पावले टाकावीत. उपयुक्ततेचा मार्ग अवलंबावा. सुंदर, सुडौल फूल सुवास नसेल तर दुय्यम ठरते. सुंदर दिसणारे फळ चवीला मधुर नसेल तर व्यर्थ ठरते. तद्वतच शरीराने सुंदर असलेली व्यक्ती मनाने कुरतडलेली, कुचकट असेल तर त्या व्यक्तीच्या सौंदर्याची किंमत शून्याहूनही कमी ठरते. सुंदर चेहऱ्यापेक्षा सुंदर कृती चांगली असते. सुंदर कृतीपेक्षा सुंदर वर्तणूक चांगली असते. कारण त्यातून खऱ्या अर्थाने आनंद, सामर्थ्य मिळते. ज्यावेळी आपण एखादी आकृती पाहतो, कलाकृती पाहतो, त्यावेळी तिच्या अनेक भागांवरून आपण नजर फिरवितो. त्यातील सौंदर्य नजरेने टिपतो. एखादी कलाकृती चांगली की वाईट हे आपले विचार ठरवितात. म्हणून आपले विचार चांगले हवेत. ज्या रंगाचा चष्मा, त्या रंगाचे जग दिसते. व्यक्तीच्या बऱ्या किंवा वाईट दृष्टीमुळे जगातील गोष्टी व्यक्तीला बऱ्या किंवा वाईट दिसतात. म्हणून आपली दृष्टी बदलणे, दृष्टिकोन बदलणे तितकीच आवश्यक गोष्ट आहे. शिक्षणामुळे दृष्टी बदलते असे म्हणतात. शिक्षणामुळे दृष्टी येते हेही तितकेच सत्य आहे. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार परि विद्येसम एकही शोभादायक नसे अलंकार आपल्या भोवतीच्या अनेक अलंकारांपैकी विद्या हा एक अलंकार आहे, हेदेखील आपण पार विसरून गेलो आहोत; जगातील जे नको ते पाहत आहोत. चांगल्याचा विसर पडत आहे. मंगलाकडे लक्ष कमी, अमंगलाकडे जास्त आहे. म्हणून जगातले जे चांगले-चुगले आहे, ते नजरेआड होत आहे. आदर्श गोष्टी, आदर्श व्यक्ती, चांगल्या गोष्टी, चांगल्या व्यक्ती नाहीतच ६२ । जगण्यात अर्थ आहे..