पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागला आहे. टीव्ही, गाडी, बंगला, दागिने आणि चारचौघांपेक्षा अधिक पैसा आपल्याला कसा मिळविता येईल आणि सर्वांच्यासमोर त्याचे प्रदर्शन कसे करता येईल यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. पैसा मिळवत असताना प्रसंगी सद्विवेकबुद्धी गहाण टाकून, चांगूलपणा सोयिस्करपणे विसरून, भ्रष्टाचाराची कास धरून, 'मी एकटा वाईट वागलो म्हणून काय बिघडलं?' असा विचार मनात करून किंवा आयुष्यात हे चाखून पाहायला हवे अशी मनाची समजूत घालून येन-केन प्रकारे बऱ्याचदा तो चांगल्या आचारविचारांपासून दूर जात असतो. खरा आनंद हा स्थावर मालमत्ता वाढविण्यात, संपत्ती-चैनीत, नशापार्टी करण्यात किंवा आळसावून पडून राहण्यात कधी नसतो. मग खऱ्या आनंदाचा क्षण किंवा सुखाचा क्षण कोणता ? ज्या क्षणी मनावर कोणताच ताण नसतो, ज्या क्षणी आपल्या मनात कोणतीही विवंचना नसते, ज्या क्षणी आपल्याला आपण चूक केली असे वाटत नाही, ज्या क्षणी सर्व जग चांगले आहे, भोवतालचे लोक चांगले आहेत असे वाटते, तो क्षण जगण्यात अर्थ आहे, जगण्यात मौज आहे असे वाटणारा क्षण चांगला. असे क्षण आपल्या जीवनात खूपदा यावेत, किंबहुना आजन्म या क्षणांची मालिका आपल्याबरोबर राहावी असे वाटणे स्वाभाविक आहे. हे साध्य होण्यासाठी खरा आनंद कशात मिळतो याचा बारकाईने विचार करायला हवा. खरा आनंद हा आपल्या दैनंदिन कृतीतून, आचारविचारांतून निर्माण करावा लागतो आणि हा आनंद इतरांना देण्याने आपल्याला मिळतो. आपण शेतामध्ये मूठभर बी पेरतो आणि आपल्याला मणभर धान्य मिळते. डोंगरकपारीत आपण मोठ्याने शब्द उच्चारले तर त्याचा प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला येतो. चांगले शब्द उच्चारले तर चांगलेच शब्द परत येतात. निसर्गाचा हा नियम माणसांनाही लागू आहे आणि नेमके हेच आपण विसरतो. इतरांना आपण चांगले विचार, चांगले गुण, चांगली वागणूक दिली तर आपल्याला या गोष्टी इतरांकडून हमखास मिळतील. खरा आनंद । ६५