पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्व घटकांना आपला दृष्टिकोण बदलणे गरजेचे आहे. आजच्या जाहिरातींच्या जगात मनाचे सौंदर्य असू शकते याचा संपूर्ण विसर पडलेला आहे. खरा आनंद आपल्या कृतीतून आणि विचारातून निर्माण करावा लागतो. हा आनंद इतरांना देण्याने आपल्याला मिळतो. आपले बोलणे हे आनंद निर्माण करण्याचे प्रभावी साधन आहे. स्वतःसंबंधी बोलण्यापेक्षा इतरांसंबंधी बोलणे आज अधिक आनंददायक ठरते. विवाहातून सहजीवन निर्माण व्हावे अशी अपेक्षा असते. विवाह केवळ शारीरिक सुखासाठी नसतो; तर त्यात मानसिक, कौटुंबिक, सामाजिक सुखही अंतर्भूत असते. यासंबंधीचे मार्गदर्शन होणे अगत्याचे आहे. एका संपादकीयात माणूसपण मिळविण्याचे महत्त्वाचे विवेचन आले आहे. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की, तो निसर्गनियमांचे उल्लंघन करतो. नको तितक्या प्रमाणात आणि वेळी-अवेळी खाण्या-पिण्याची चंगळ करतो. त्यासाठी अविरत पैशाचा पाठलाग करतो. पैसा आवश्यक जरूर आहे. पण पैशाचा हव्यास आवश्यक नाही. पशूंना माहीत नसलेला पैसा माणसाला पशू बनवतो. त्याने पैशाला देवत्त्व दिले की, तो दानव बनायला वेळ लागत नाही. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक मौल्यवान असते. संपत्तीचे खरे मूल्य ती ज्या नैतिक अगर नीतीबाह्य मार्गाने मिळविली जाते, त्यावर अवलंबून असते. माणसे मिळविणे ही खरी संपत्ती. वधू निवडताना रंगाकडे नव्हे, तर अंतरंगाकडे पाहा. व्यसनाला वेसण घातली पाहिजे. माणसाला व्यसन का लागते याची अनेक सवंग आणि शास्त्रीय कारणे सांगण्यात येतात. आजच्या यांत्रिक युगातील प्रचंड स्पर्धा, त्यात आलेले अपयश हे जसे व्यसनाधीनतेचे कारण आहे, तसे मिळालेले वारेमाप यश आणि पैसा हे देखील व्यसनाधीनतेचे कारण आहे. तारुण्यात नुकतीच प्रवेश करणारी मुले आणि आपण अजूनही तरुणच आहोत हे दाखवू इच्छिणारे मध्यमवयीन व्यसनाधीन बनतात. शिवाय दु:ख विसरण्याचे साधन म्हणूनही व्यसनांचा आश्रय घेतला जातो. प्रत्येकाला आरोग्य हवे असते, पण आरोग्य देणाऱ्या सवयी नको असतात. व्यसनाला वेसण घालणे त्यांना जमत नाही. आत्महत्येला कोणते पर्याय आहेत याबद्दलही त्यांनी लिहिले आहे. आत्महत्येला पर्याय ६ । जगण्यात अर्थ आहे..