पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विवाहाबाबतचे स्वप्न आणि प्रत्यक्षात घडणाऱ्या घटना यांत बऱ्याचदा बरीच मोठी दरी असू शकते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या विषयीचे अज्ञान. याबाबतीत विचार करावयाचा झाल्यास स्वत:चे विवाहाबद्दलचे विचार ज्या वयात पहिल्यांदा मनात येतात, ते वय लक्षात घ्यायला पाहिजे. हे वय म्हणजे पौगंडावस्थेतील वय. युवावस्थेतील वय. जीवनातील अतिशय नाजूक आणि महत्त्वाच्या अवस्थेतील ही वर्षे असतात. या वयात निसर्गत:च शरीर आणि मन फुलविणाऱ्या भावनांचे वादळ घोंगावत असते. विद्यालयात, , महाविद्यालयात शिकत असणाऱ्या मुलामुलींना लैंगिकता, कामजीवन, विवाह या विषयांची उत्सुकता असते. ही उत्सुकता त्यांना प्रचंड अस्वस्थ करीत असते पण याविषयीचे संपूर्ण शास्त्रीय ज्ञान युवकयुवतींभोवती असणाऱ्या माध्यमांतून मिळत नाही. संस्कृतीच्या पगड्यामुळे, आईवडिलांबाबतच्या आदरयुक्त भीतीमुळे या अस्वस्थतेची चर्चा खुलेपणाने होत नाही. मनातल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत आणि मग बऱ्याचदा मित्रमैत्रिणींकडून चुकीची किंवा विकृत माहिती मिळते. मनात चुकीचे समज निर्माण होतात. भीती वाटू लागते. प्रत्यक्ष घडणाऱ्या क्रिया आणि चुकीची माहिती यांमुळे वैचारिक गोंधळ निर्माण होऊन शैक्षणिक प्रगतीत त्याचा अडसर येऊ शकतो. या गोंधळात वाटचाल करीत असतानाच प्रत्येक युवक आणि युवतीपुढे भावी जीवनाच्या वाटचालीच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे प्रश्न 'आ' वासून उभे असतात. यांतील दोन प्रश्न महत्त्वाचे असतात. एक म्हणजे व्यवसायाची निवड आणि दुसरा जोडीदाराची निवड. व्यवसायनिवडीच्या बाबतीत आईवडील, शिक्षक, मित्रमैत्रिणी किंवा समाजातील एखादी परिचित-अपरिचित व्यक्ती, नियतकालिके-दूरदर्शन यांसारखी माध्यमे एखाद्या व्यक्तीला कोणत्याही स्तरावर मोकळेपणाने उपयुक्त ठरतात, मार्गदर्शक ठरतात. नेमके त्याच्या उलट जोडीदाराची निवड करताना घडते. स्वत:चा विवाह करताना बऱ्याच युवक किंवा युवतींच्या मनात निश्चित असे ठोकताळे सावधान... शुभ मंगल । ६९