पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जोडीदाराकडून मला काय अपेक्षा आहेत, जोडीदाराच्या माझ्याकडून काय अपेक्षा असतील' या महत्त्वाच्या बाबींचा विचार केला जात नाही आणि मग बऱ्याचदा स्वत:च्या विवाहाविषयी गांभीर्याने चिंतन न करता परिस्थितीनुरूप, इतरांच्या सांगण्यावरून, इतरांच्या आग्रहाखातर, वाडवडिलांच्या- वडीलधाऱ्यांच्या भिडेखातर, आदरापोटी अथवा संस्कारवजा दबावामुळे निर्णय घेतला जातो आणि विवाह पार पडतो. स्वत:च्या लग्नाविषयी अर्थातच लग्नाअगोदर प्रत्येक व्यक्तीला आपल्या निकटवर्तीयांशी चर्चा करावी असे वाटते. पण आपल्याकडे अशी चर्चा बऱ्याचदा होत नाही. लज्जा आणि भिडस्तपणा ही महत्त्वाची कारणे. वडीलधाऱ्या व्यक्ती काय म्हणतील अशी अकारण भीती, आपण विषय काढला तर त्याला उतावळेपण म्हणतील का अशी शंका, आईवडिलांशी किंवा पालकांशी नसलेला संवाद ही कारणेही आहेत. याविषयी सभोवतालच्या माध्यमांतून मिळणारे अपुरे ज्ञान, मित्र-मैत्रिणींबरोबरच्या चर्चेत होणारी टिंगलटवाळी किंवा मस्करी आणि म्हणून अशा मित्रमैत्रिणींबरोबरच्या चर्चेतून निघणाऱ्या निष्कर्षाची अशाश्वती किंवा दैनंदिन जीवनातल्या कामकाजात, शिक्षणात, व्यवसायात मग्न असल्याने विवाहासारख्या (चिल्लर ?) गोष्टीविषयी चर्चा करायला नसणारा वेळ यांमुळे एक तर चर्चा होत नाही आणि झाली तर तिला ठाम निष्कर्षाचे पूर्णत्व येत नाही. मग नशीब, दैव, समंजसपणा, विनय, वडीलधाऱ्या माणसांचा मान, तडजोड इत्यादी गोंडस किंवा मनाची समजूत घालणाऱ्या शब्दांचा आधार मनाला देत बऱ्याच व्यक्ती स्वत:ला आयुष्याच्या भोवऱ्यात झोकून देत (कदाचित) नाइलाजाने चेहऱ्यावर हसरेपणा ठेवून बोहल्यावर उभ्या राहतात आणि विवाहबंधनात अडकतात, त्या कायमच्याच. म्हणून विवाहबंधनात अडकू इच्छिणाऱ्या सर्व विवाहेच्छू युवामनांना जागे करण्यासाठी, त्यांच्याशी विवाहसंदर्भात हितगुज करण्यासाठी, त्यांच्या हळुवार मनाला जपत वास्तव जीवनातील कटू सत्याचे दर्शन घडवून आणण्याचा, त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या निवडीत मार्गदर्शन करण्याचा, विवाह या विषयाची ओळख करून देऊन त्या विषयाची सर्वांगीण माहिती सावधान... शुभ मंगल । ७१