पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कंटाळा येणे हा गुणधर्म (की दोषधर्म) माणसात प्रकर्षाने आढळतो. माणसाला परमेश्वराने इतर प्राण्यांच्या तुलनेत सर्वाधिक बुद्धीची अनमोल देणगी दिली. पण ही बुद्धी देताना (कदाचित) खुद्द परमेश्वरानेच काहींच्या बाबतीत कंटाळा केला की काय असे क्षणभर वाटून जाते. कारण आपल्यापैकी अनेकांना परमेश्वराने बुद्धीबरोबर कंटाळादेखील भरभरून दिलेला असतो. अनेक व्यक्ती बुद्धिमान असतात, चाणाक्ष असतात, चतुर असतात, कार्यक्षम असतात, पण त्यांना आळस चिकटलेला असतो. त्यामुळे अशा व्यक्तीची बुद्धी त्या व्यक्तीच्या आणि समाजाच्या प्रगतीला मारक ठरत असते. या व्यक्ती (मग हुद्दा कोणताही असो, पदवी काहीही असो) म्हणजे 'असून अडचण नसून खोळंबा' या प्रकारात मोडतात. कारण स्वत:च्या बुद्धीच्या जोरावर (?) या व्यक्ती आयुष्यभर आराम करतात आणि कंटाळा आला म्हणून इतरांची महत्त्वाची कामे रखडवतात. अशा रखडलेल्या कामांमागील कंटाळा 'नोटा दिसताच' दूर पळतो हा कित्येकांचा अनुभव असावा. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. कंटाळ्याचेसुद्धा तसेच आहे. कंटाळ्याचे दोन प्रकार आहेत. एक उपकारक कंटाळा तर दुसरा अपकारक कंटाळा. सतत कामात दंग असलेल्या व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. तिला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची नितांत गरज असते. ही विश्रांती वेळच्या वेळी घेतली तर कामाचा उरक तर वाढतोच, पण कामाचा दर्जाही उंचावतो. स्वतःची आणि त्या विशिष्ट कार्यावर अवलंबून असलेल्या सर्वांची त्यामुळे प्रगती होते. म्हणून अशा व्यक्तीने विश्रांतीसाठी कामाचा योग्य नि विशिष्ट कालावधीसाठी कंटाळा केला तर तो उपकारक ठरतो. 'मी आणि माझी उत्पादकता' हे शीर्षक डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने आत्मनिरीक्षण करावयाचे ठरविल्यास कंटाळा न आणणाऱ्या प्रश्नांची मालिका नजरेसमोर येते. मी सकाळी लवकर उठतो का? मी फक्त खाण्यालायक तेच खातो का? मी नियमित व्यायाम करतो का? मला जो मोबदला मिळतो त्या अनुरूप (मोबदल्याइतपत तरी) काम मी करतो का? दिवसभरातील वेळ ७४ । जगण्यात अर्थ आहे..