पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मी चांगल्या कामासाठी वापरतो का? मी गप्पाटप्पा, बाष्कळपणा, टीकाटिपणी टाळतो का? कामासाठीचा वेळ मी कामासाठीच घालवतो का? माझे काम मी कंटाळा न करता करतो का? माझ्या नियमितपणामुळे इतरांचा पैसा, ताकद यांची बचत होते का? माझ्या कंटाळा न करण्यामुळे माझी व इतरांची प्रगती होते का? माझ्या कंटाळा न करण्यामुळे अप्रत्यक्षपणे देशाच्या प्रगतीला हातभार लागतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे ज्या व्यक्तीच्या बाबतीत 'होय' अशी असतात, त्यांचा कंटाळा हा नेहमी उत्पादकच असतो. अर्थातच या प्रश्नांची उत्तरे 'नाही', 'नाही' अशी असतात, त्यावेळी तो कंटाळा अपकारक, निंद्य, घातक असतो. कामादरम्यान तो येत असतो. तो आणला जात असतो. अपकारक किंवा घातक कंटाळ्याचे प्रकार माणसागणिक बदलत असतात. काही लोकांना रिकामटेकडेपणामुळे कंटाळा येत असतो, तर काहींना सवयीमुळे कंटाळा येत असतो. काही लोक (स्वत:ला) सुख मिळते म्हणून कंटाळा करतात तर काही लोक (इतरांवर ) सूड उगवायचा म्हणून कंटाळा करतात. हा घातक कंटाळा कुणालाही येऊ शकतो. स्त्री-पुरुष, उच्च-नीच, गरीब- श्रीमंत, हिंदू-मुस्लीम असा कोणताही भेदभाव कंटाळ्याकडे असत नाही. काही लोक आयुष्यभर काहीच करत नाहीत. भूक, निद्रा आणि मैथुन या तीन प्राथमिक शारीरिक गरजा भागल्या की यांच्या आयुष्यात करण्यासारखे काहीही नसते (असे त्यांना वाटते). अशा व्यक्ती तासन् तास महिनो न् महिने, वर्षानुवर्षे बसून असतात. अशा जिवंत मढ्यांची दखल समाज कधीच घेत नाही. अगदी त्यांच्या सर्वार्थाने नसण्यानंतरही! काही व्यक्ती तर कंटाळ्यात इतक्या गुंग असतात की त्यांना धड स्वत:चीही दखल घेता येत नाही. या व्यक्ती आयुष्यभर एखाद्या दारूसारख्या नशेमध्ये अवघे आयुष्य बुडवून टाकतात. थोडासा कंटाळा केल्याने आयुष्यभर दुःख करण्याची वेळ आपल्यापैकी कित्येकांवर येत असते. घराचे दार-कुलूप नीट न लावल्याने मोठी चोरी किंवा दरोडा होणे, अभ्यासात अळमटळम केल्याने बारावीसारख्या स्पर्धापरीक्षांमध्ये अपयश पदरात पडून आयुष्याला वेगळीच दिशा मिळणे, कंटाळा टाळा । ७५