पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाहनाच्या क्षमतेची पूर्ण चाचणी न करता प्रवासाला गेल्याने अपघात होऊन अनेकांच्या मृत्यूला जबाबदार होणे, श्रद्धापूर्वक ज्यांनी आपला जीव ताब्यात दिला त्यांच्यावर उपचार - शस्त्रक्रिया करताना योग्य ती खबरदारी घेण्यात कंटाळा केल्यामुळे रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होणे, वेळेवर कागदपत्रांची पूर्तता किंवा सही न केल्याने एखाद्या गरीब व्यक्तीस सोयीसवलतींपासून वंचित राहावे लागणे, अपहरण- खून- दरोडा - बलात्कार यांसारखे भयंकर अपराध करूनही न्यायप्रक्रियेस विलंब लागल्याने वर्षानुवर्षे गुन्हेगारांनी उजळ माथ्यांनी तुरुंगाबाहेर किंवा तुरुंगात चैनीत जीवन जगणे... या साऱ्या गोष्टी आपल्या महान देशात गेली अनेक वर्षे घडत आहेत. यांतील प्रत्येक घटनेस कोणाचा ना कोणाचा कंटाळा कारणीभूत असतो. कारण कंटाळा ही शारीरिक गरज नसून ते चैनीचे साधन आहे अशी कित्येकांची धारणा झालेली असते. कंटाळ्यामुळे आपण स्पर्धेत मागे पडत आहोत हे कित्येकांच्या गावीही नसते. याबाबतीतली सर्वश्रुत अशी ससा आणि कासवाची गोष्ट सतत स्मरणात ठेवली पाहिजे. कंटाळा केल्याने ससासुद्धा हरू शकतो. जीवनात यशस्वी होऊ इच्छिणाऱ्यांनी हे नजरेआड करून चालणार नाही. जगातल्या जवळपास सात अब्जांपैकी सव्वा अब्जांचा भार पेललेल्या भारतभूमीतल्या सुज्ञ, सभ्य, जाणकार स्त्रीपुरुष सज्जनहो, अगदी कळकळीने सांगावेसे वाटते की, संगणकाच्या या युगात, केवळ स्वत:च्या भौतिक सुखाचा • विचार न करता आत्मिक सुखाचा विचार करुया आणि स्वत:च्या प्रगतीबरोबर समाजाचा आणि देशाचा सर्वांगीण विकास साधूया. त्याचसाठी दैनंदिन जीवनात आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्यासाठी, इतरांचे शारीरिक- मानसिक - आर्थिक सामाजिक नुकसान टाळण्यासाठी, स्वत:चा उत्कर्ष साधण्यासाठी, स्वत:च्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील सर्वांच्या सर्वांगीण समाधानासाठी, आपल्यावर आणि आपल्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सर्वांच्या सर्व प्रकारच्या व्यथा टाळण्यासाठी कंटाळा टाळला पाहिजे. ७६ । जगण्यात अर्थ आहे..