पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सापडायला हवी. अवयवदानाच्या बाबतीतही दाता आणि रुग्ण यांना रक्तगटापासून अनेक चाचण्यांच्या चक्रव्यूहातून जावे लागते. रुग्णासाठी सुयोग्य 'दाता' 'आपला' च कुणी तरी असेल तर हे दान 'एका' अर्थाने दान ठरते. कुणी बाहेरचा असेल तर रुग्णाच्या ऐपतीनुसार त्याची किंमत ठरते आणि मग अवयवदान पार पडते. नेत्रदानाचा संकल्पही सहजगत्या स्वीकारली जाणारी चळवळ असे आजचे तरी चित्र आहे. नेत्रदान हे मरणोत्तर करावयाचे असते. त्यामुळे त्यात काही धोका असण्याची काळजी असत नाही. पण मृत्यूनंतर आप्तस्वकीयांकडून यात अडथळा आणला जाण्याची उदाहरणे काही वेळा घडतात. डोळे काढल्यानंतर मृत देहाचा चेहरा बेढब दिसेल ही नातेवाईकांच्या डोक्यातील विचित्र कल्पना. खरे तर नेत्रदान केल्यानंतर डोळ्याच्या खोबणीवर व्यवस्थित पट्टी केली जाते. त्यात कोणताही बेढबपणा येत नाही. नेत्रदानाच्या बाबतीत असणारा उत्साह देहदानाच्या बाबतीत मात्र असत नाही. मृत्यूनंतरचे संस्कार, क्रियाकर्म यांचा खूप खोल ठसा अनेकांच्या मनावर असतो. पुनर्जन्म, आत्मा, अतृप्ती, भूतयोनी, पिशाच्चयोनी... वगैरेंच्या जंजाळात अडकलेले जीव, जीव गेल्यानंतरही आपल्या देहाला हात लावू देत नाहीत. आज महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वेगाने वाढत आहे. अॅलोपॅथी महाविद्यालयांचा अपवाद वगळता इतर महाविद्यालयांतील एकूणच अभ्यासक्रम आणि तेथील गांभीर्य यांविषयी तूर्तास न लिहिलेले बरे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना 'शरीररचनाशास्त्र' विषयाचे नीटपणे आकलन करून घेण्यासाठी मानवी मृतदेहांची आवश्यकता असते. सात ते आठ विद्यार्थ्यांसाठी एक मृतदेह असे हे प्रमाण असावे. दुर्दैवाने अनेक वैद्यकीय महाविद्यालयांत पंचवीस-तीस मुलांमध्ये एक किंवा ऐंशी- शंभर मुलांच्या बॅचसाठी एक मृतदेह इतके तोकडे प्रमाण असते. वैद्यकशास्त्राचा पाया असलेल्या या विषयाचे ज्ञान अशा प्रकारे घेऊन उत्तम डॉक्टर बनणे ही तारेवरची कसरत म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यासाठी गरज असते ती देणाऱ्याने देत जावे । ८५