पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मृतदेहांची! देहदानाची चळवळ अधिक व्यापक बनल्यास मृतदेहांचा तुटवडा महाविद्यालयांना पडणार नाही. समाजाला चांगले डॉक्टर हवेत तर त्यांच्या अभ्यासासाठीची सोयही आवश्यकच नाही काय? परंपरेचे जू मानेवरून उतरवून आपला अमूल्य मृतदेह मातीमोल करून 'मातीत' टाकण्याचे थांबवायला हवे. अशा क्रियांमुळे होणारे प्रदूषण हाही खूप मोठा विषय आहे, तो वेगळाच. दैनंदिन जीवन जगताना आपल्याला अनेक प्रसंगांना, घटनांना सामोरे जावे लागते. या प्रत्येक क्षणी मनात दातृत्वाची भावना जागी असणे महत्त्वाचे! रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करून प्रेमाचे चार शब्द देणे हे एक प्रकारचे दानच! शिल्लक पडलेली औषधे गरजू रुग्णांना देणे हेसुद्धा दानच! रुग्णच काय, पण आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आनंद वाटेल असे आचरण ठेवणे म्हणजे सतत 'आनंदाचे दान' करण्याचे पुण्यकर्मच म्हणता येईल. जाता जाता.. आपण आपल्याकडील काय द्यायचे ठरवलेय, याचे उत्तर आपण आपल्या मनालाच देऊया. नेत्रदान, देहदानाचा संकल्प आजच करूया. दर वाढदिवसाला रक्तदान जरूर करावे आणि 'सारे भारतीय माझे बांधव आहेत...' या प्रतिज्ञेचे स्मरण करून, मनातील आपुलकीची भावना जागृत ठेवूया. हे सारे संकल्प आजच करायला काही हरकत नाही. त्यासाठी निमित्ताचीही काही गरज नाही. नाही का ? ८६ । जगण्यात अर्थ आहे..