पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिणाम उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि पोटोबाची हाक आली की डोळे मिटून त्यावर मारतो. यांपैकी काही पदार्थ अजिबात घ्यायचे नसतात, तर काही अत्यंत अल्प प्रमाणात घ्यायचे असतात. बऱ्याच जणांच्या आहारात मांसाहाराचा आणि अन्य पदार्थांचा समावेश झालेला आहे. चहा-कॉफी आणि अन्य पेयांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, ती दिवसांतून एकदाच घ्यावीत. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. आपल्यापैकी अनेक जण तंबाखू आणि तिचे अनेक भाऊबंद मावा, गुटखा वगैरे... चघळतात. बिडी-सिगारेटसारख्या तंबाखूच्या पिलावळीला श्वासात सामावून घेतात. दारूच्या देशी-विदेशी प्रकारांना चक्क शरीरात आश्रय देतात, एवढेच नव्हे तर काही लोक नको नको ते हादडतात. आपल्या महान देशातील आपले लहान-सहान नेते वाट्टेल ते खातात. डाळी, तेले, गहू, तांदूळ वगैरे प्रकार तर शाकाहारी सदरात मोडतात. पण काही 'चालू' चारा खातात. महाराष्ट्रात तर दगड नि सिमेंट-वाळू पचविल्याची उदाहरणे आहेत. काही सैतानांनी तर भूखंडच गिळंकृत केले आहेत. यांना 'भ्रष्टाहारी' म्हणायला हरकत नाही. या नेत्यांचा वारसा आम्ही सर्वांनीच घेतलाय असे वाटते. कारण चिल्लर लोक चिल्लर खातात. आपापल्या कुवतीप्रमाणे, आपापल्या क्रेडीटप्रमाणे ते पैसे, नाणी, नोटा खातात. सरकारी-निमसरकारी आणि बिगरसरकारी (यात जनताजनार्दन आलेच) यांपैकी कोणीही सोवळे नाही. आजच्या सहकाराचे 'विना स्वाहाकार नही उद्धार' हे घोषवाक्यच बनल्यासारखे वागणे चालले आहे. खाणाऱ्यांची संख्या खूप आहे. प्रकारही खूप आहेत. यादीही मोठी आहे. काही लोक माती खातात ('जातीसाठी माती खाणे' हो टोकाचा प्रकार झाला), काही लोक नखे खातात, काही लोक इतरांचे डोके खातात- पण हा मांसाहार नव्हे- आणि त्यापाठोपाठ शिव्याही खातात. अशा ८८ । जगण्यात अर्थ आहे..