पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनोगत निसर्गाने किंवा ईश्वराने आपल्याला बहाल केलेले जीवन जगत असताना, आपण काही वेळा अगदी क्षुल्लक कारणामुळे उदास होऊन जातो. एखादी घटना अशी घडून जाते की, आपण सैरभैर होतो, बेचैन होतो, काहीही सुचेनासे होते. कामात असलो तरी कामात लक्ष लागत नाही. कामाचे तीन-तेरा वाजतात. शरीर कामात असते पण मन असत नाही. काही वेळा अक्षम्य चुका होतात. आपल्या कामातील चुकांमुळे इतरांवर अन्याय होऊ शकतो; इतरांचे अपरिमित नुकसान होऊ शकते. कामात नसलो तर वेळ जाता जात नाही. केवळ मेंदूच नव्हे, तर आपल्या भोवतालचा सारा आसमंत या एका घटनेने व्यापून टाकलेला असतो. यावेळी मनाची स्थिती काही वेगळीच झालेली असते. अशा वेळी आपल्या जवळ कुणीतरी आपले असावे असे तीव्रतेने वाटू लागते. आपले नसलेल्या कुणी असे नाटक केले तरी ते त्यावेळी हवे असते. अशा वेळी जवळ कुणी नसले तरी एखादे पुस्तकही चांगल्या सोबतीची उणीव भरून काढू शकते. राग, लोभ, मोह, मद, माया, मत्सर या षड्रिपूंनी व्यापलेल्या प्रत्येक व्यक्तीचे कधी ना कधी, कुठे ना कुठे, काही ना काही चुकते; नव्हे, 'वेळ' त्या व्यक्तीला चुकवते; पण चूक दुरुस्त करणे हा त्यावरील सुसंस्कृत उपाय असतो. यासाठी किमान स्वत:च्या मनाच्या पातळीवर चूक मान्य करणे ही पहिली पायरी असते. बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत हे घडताना दिसत नाही. आपली चूक नसताना देखील काही वेळा छोट्या-मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. अशा वेळी संकटाशी सामना करण्याचे धैर्य अंगी असावे लागते. तरच जगणे सुसह्य होते. जगण्याला अर्थ प्राप्त होतो. आयुष्यात काय करायचे, संकटांना तोंड कसे द्यायचे, धीराने कसे जगायचे, दुःख कसे पचवायचे या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा प्रयत्न डॉक्टर म्हणून जगताना केला. माणसातला डॉक्टर म्हणून, डॉक्टरांतील माणूस म्हणून, कधी डॉक्टरच्या चष्म्यातून, ८ । जगण्यात अर्थ आहे..