पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खांदा लावून झटत आहे आणि त्या त्या क्षेत्रात ती स्वतःचा ठसा उमटवत आहे. पण हे असताना तिला तितक्याच प्रमाणात मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. घरात आणि केवळ घरात, चार भिंतींच्या आत कोंडून राहिलेल्या स्त्रीला खूप तणावग्रस्त जीवन कंठावे लागते. या ताणतणावाच्या मुळाशी आर्थिक कारणे असू शकतात किंवा कुटुंबातील इतर सदस्यांशी असणाऱ्या नातेसंबंधांतही या ताणतणावाची कारणे दडलेली असू शकतात. पती आणि मुले यांची बौद्धिक - भावनिक पातळी आणि त्यांचे तिच्याशी असलेले बंध, यांवरही ताणतणाव काही अंशी अवलंबून असतात. घरातली वेगवेगळी कामे, घरातले वातावरण, कुटुंबातील इतर व्यक्ती, घरातल्या कामांचा पडणारा ताण, स्वयंपाकाशिवाय करावी लागणारी इतर असंख्य कामे, पतीची व्यसनाधीनता, पतीची सामाजिक प्रतिष्ठा, पतीची एकंदरीत वर्तणूक, त्याचा स्वभाव, घरातील इतर व्यक्तींचे स्वभाव आणि त्यांची वर्तणूक... अशा अनेक गोष्टींवर स्त्रीच्या ताणतणावाची तीव्रता अवलंबून असते. तिच्या विचारांचा-कामसूपणाचा विचारही न होणे, दुय्यम दर्जाची वागणूक मिळणे हे तणावाला कारणीभूत ठरू शकते. या सर्वांबरोबरच त्या स्त्रीची बौद्धिक कुवत, तिचे शिक्षण आणि एकंदर व्यक्तिमत्त्व यांवरही तिच्या मानसिक ताणतणावाचे स्वरूप आणि तीव्रता अवलंबून असते. अनेक विकसनशील किंवा विकसित देशांत आजही स्त्रीला नोकरी करता करता घरातल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. साहजिकच अशा स्त्रीला कौटुंबिक वातावरणामुळे उद्भवणारे ताण आणि कामाच्या ठिकाणी उद्भवणारे ताण अशा दुहेरी ताणतणावांना तोंड द्यावे लागते. घरातील सर्व कामे उपलब्ध वेळेत आटोपून, ती सर्व कामे आवरताना घरातली प्रत्येक व्यक्ती कशी समाधानी राहील याची काळजी घेऊन, तिला ऑफिसचा, नोकरीचा किंवा उद्योगाच्या ठिकाणचा रस्ता पकडावा लागतो. ऑफिसला किंवा नोकरीच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या वरिष्ठांनी सांगितलेली सर्व कामे कोणतीही चूक होऊ न देता करावी लागतात. नोकरीचे ९२ । जगण्यात अर्थ आहे..