पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ठरलेले आठ किंवा त्याहून अधिक तास तेथील कर्तव्ये - कामे करावी लागतात. ठरल्या वेळात ठरलेली कामे करण्याचा एक प्रकारचा दबाव तिच्या मनावर असतो. त्यातच जर काम करण्याचे ठिकाण आर्थिक उलाढालीचे (उदाहरणार्थ- बँक) असेल तर कामात चूक होऊ नये यासाठी डोळ्यांत तेल घालून काम करावे लागते. अर्थातच याचाही ताण आणखीनच वाढतो. विवाह हे आयुष्यातील एक महत्त्वाचे कर्तव्य मानले गेले आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यातील हे एक पवित्र आणि नाजूक नाते आहे. यात जशी कायदेशीर बाजू असते तशी ती भावनिकही असते. विवाह करताना प्रत्येक व्यक्ती आपल्या जोडीदाराबद्दल काही स्वप्ने, काही अपेक्षा मनात ठेवून असते. अर्थात ही स्वप्ने आणि या अपेक्षा प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत पूर्ण होतीलच किंवा होतातच असे नाही. म्हणून 'विवाह ही एक तडजोडच असते' असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. दांपत्त्यातील एखादी व्यक्ती जेव्हा सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास असमर्थ ठरते, तेव्हा त्यांच्यांत मानसिक-वैचारिक दरी निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यातून कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते. अर्थातच याचा परिणाम म्हणून दोघांचाही ताणतणाव वाढतो. यामध्ये स्त्रियांचा ताण अधिकतर वाढतो. जर ती स्त्री नोकरी करणारी असेल तर त्यात आणखीनच भर पडते. भारतातील चाळीस कोटी काम करणाऱ्या व्यक्तींपैकी जवळपास साडेबारा कोटी स्त्रिया आहेत. यांतील बहुसंख्य स्त्रिया ग्रामीण भागात काम करतात. काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या शहरी भागात तुलनेने कमी आहे. सुमारे ९५% स्त्रिया असंघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या आहेत. काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या १९८१ मध्ये १९.७% होती, ती २००१ मध्ये २५.७% झाली. ग्रामीण भागात ती २३.१% वरून ३१% पर्यंत वाढली, तर शहरी भागात ८.३% वरून ११.६% इतकी वाढली. काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या भरपूर असली, तरीसुद्धा त्यांचा दर्जा, त्यांना मिळणारा पगार, कामाची शाश्वती, त्यांच्या कामाचे स्वरूप यांमध्ये फारशी सुधारणा झाली आहे, असे म्हणता येत नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यात आणि वाढत्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे घराबाहेरील 'ती'चा ताण । ९३