पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्रियांची, विशेषकरून काम करणाऱ्या स्त्रियांची हलाखीची अवस्था आणखी बिकट झाली आहे. कारण या परिस्थितीमुळे कामकरी स्त्रियांवरचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. हा ताण शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्वरूपांचा असतो. काम करण्याच्या ठिकाणी पुरुष अथवा स्त्री कोणीही सहकारी म्हणून असले तरी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सामाजिक संबंधांमुळे ताण येतो. स्त्रियांवरील ताण वाढण्याचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे काम करणाऱ्या स्त्रियांना कौटुंबिक वातावरणाशी मिळते-जुळते घेत आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांना तोंड देत जगावे लागते. या धावपळीत अनेक गोष्टींबाबत तडजोड करावी लागते आणि त्यातून ताण जन्माला येतो. बहुसंख्य स्त्रियांना कामाच्या ठिकाणचा ताण हा लिंगभेदामुळे येतो. सार्वत्रिक समज असा आहे की, पुरुषांची कार्य करण्याची क्षमता किंवा कामाचा वेग हा स्त्रियांपेक्षा अधिक असतो. त्यामुळे कोणतेही काम पुरुष ज्या वेगाने, ज्या पद्धतीने, ज्या कुशलतेने, ज्या आत्मविश्वासाने आणि ज्या खोलीने हाताळतो तशी वेगवेगळ्या प्रकारची हातोटी किंवा क्षमता स्त्रीकडे नसते. नेमका हा 'गैरसमज'च स्त्रियांच्या ताणतणावाचे प्रमुख कारण आहे. कामाच्या ठिकाणी एखादे काम ती स्त्री आहे म्हणून तिच्याकडे दिले जात नाही किंवा तिच्याकडेच ते दिले जाते. स्त्री असल्याचा न्यूनत्वाचा दृष्टिकोन अनेकांच्या ठायी असतो. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्त्रीच्या वरिष्ठ पदावरील व्यक्ती जर पुरुष असेल तर त्यात म्हणजे ताणतणावांत भर पडण्याची शक्यता अधिक असते. वरिष्ठाची मानसिकता, त्याची काम करण्याची पद्धत आणि त्याचे एकंदर व्यक्तिमत्त्व यांवर त्या स्त्रीवर येणारा ताणतणाव अवलंबून असतो. काही वेळा काही स्त्रियांना लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागते. जर स्त्रीने विरोध केला किंवा या बाबतीत सहकार्य केले नाही तर तिच्या कामामधील उणिवा दाखविणे, तिच्यापुढे कामाचा डोंगर उभा करणे अशा प्रकारांनी किंवा अन्य मार्गांनी त्या स्त्रीला त्रास देण्याचे प्रकार उद्भवल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले आहे. ९४ । जगण्यात अर्थ आहे..