पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांभाळण्यासाठी घरी कुणाची तरी वेगळी व्यवस्था करावी लागते. अर्थात या दोन्ही गोष्टी सहजासहजी शक्य होत नाहीत. पाळणाघरात मूल ठेवले तरी तिथे ते मूल सुरक्षित आहे की नाही याची एक विवंचना तिला कामाच्या ठिकाणी सतत लागून राहते. त्याचा परिणाम कामाच्या दर्जावर होतो. त्यातून ताण निर्माण होऊ शकतो. रात्रपाळीचे काम करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्यातील ताण-तणाव हा एक वेगळा विषय आहे. या स्त्रियांमध्ये शारीरिक दृष्टीनेच ताणाचा उगम होतो. अशा स्त्रियांमध्ये चिडचिडेपणा, थकवा, निद्रानाश अशा गोष्टी घडून येतात आणि त्यांतूनही अनेक प्रकारचे मानसिक ताण निर्माण होण्याच्या शक्यता असतात. युनियनमध्ये किंवा कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न आणखी वेगळे असतात. त्यांना कुटुंबांतून पाठिंबा मिळतोच असे नाही. अशा संघटनांमधून काम करणाऱ्या स्त्रियांच्या मानसिक ताणाकडे लक्ष देणे हे काम युनियनकडून बहुतकदा होत नसते. त्यामुळे युनियनमध्ये काम करत असताना येणारे शत्रुत्व, वादविवाद, चर्चा यांतून काही वाईट प्रसंग किंवा आपत्ती त्यांच्यापुढे उभ्या ठाकू शकतात. अशा वेळी स्त्रियांना व्यक्तिगत पातळीवरच त्याचा मुकाबला करावा लागतो. या स्त्रियांच्या चारित्र्यावर इतरांनी विनाकारण संशय घेण्याच्या अधिक शक्यता असतात. गरोदरपणात स्त्रियांचा मानसिक ताण वाढतो. तसाच मेनोपॉज हाही एक नाजूक काळ आहे. या काळात रजोनिवृत्ती होते. यावेळी शरीरातील अंत:स्रावी ग्रंथींमध्ये म्हणजे हार्मोन्समध्ये काही विशिष्ट बदल होतात आणि त्याचा परिणाम म्हणून मानसिक ताण वाढतो. बाहेर काम करणाऱ्या स्त्रीला अनेक कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्याचाही ताण तिला सहन करावा लागतो. बऱ्याच लोकांना असे वाटते की, नोकरी करणारी स्त्री घरात काहीच करत नसेल किंवा घरच्या कामासाठी इतर काही व्यवस्था असेल. पण बहुतांश ठिकाणी नोकरीवरील काम संपल्यावर स्त्री घरी पोहोचते आणि घरच्या कामात स्वत:ला जुंपून घेते. ९६ । जगण्यात अर्थ आहे..