पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/154

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





देणान्याचे हात


      माणसाच्या ज्या मूलभूत वृत्ती आहेत, त्यात संग्रह एक आहे. मनुष्य भविष्याची गरज म्हणून जसा संग्रह करतो, तसा तो लोभामुळेही करतो. गरजेपेक्षा अधिक संग्रह समाजात विषमता निर्माण करतो. माणसं संग्रह करतात स्थावर, तर जंगम संपत्ती चंचल, गतिशील. गरजेपेक्षा अधिक संग्रह माणसाला चैन पडू देत नाही. संपत्तीचा विनियोग, उपभोग विवेकाने करणारी माणसं अतिरिक्त संपत्ती दान करतात. दान करण्यामागे दया, साहाय्य, पुण्य, उदारता असे अनेक भाव असतात. धर्मात दानाचे महत्त्व आहे. त्यामागे पुण्यप्राप्तीची आकांक्षा असते. अपेक्षेने केलेल्या दानाची किंमत शून्य असते. दान निरपेक्ष, निःस्वार्थ हवं. दानामागे परताव्याची अपेक्षा असता कामा नये. 'नेकी कर और समुंदर में डाल' इतकं ते निरिच्छ हवं.
     दान त्याग असायला हवा. त्यागात गरज असताना साहाय्याची उदारता असते. त्यागपूर्ण दान श्रेष्ठ, शिवाय ते देव, धर्म, दैवादी भावनेपेक्षा समाजहितार्थ करणे अधिक महत्त्वाचे. मंदिराच्या जीर्णोद्धारापेक्षा जिवंत माणसाचा विकास केव्हाही श्रेष्ठ, दानाचे अनेक प्रकार आहेत. अन्नदान, धनदान, वस्त्रदान, नेत्रदान, रक्तदान, देहदान इत्यादी. सर्वांत श्रेष्ठ सर्वस्व दान. त्याला मोठी हिंमत लागते. तुम्ही 'स्व'चं विसर्जन करू शकाल, तेव्हाच ते शक्य आहे. संतपदास पोहोचण्याची ती कसोटी होय. मानवी जीवनात दानास इतके महत्त्व का? असा विचार करू लागाल तर लक्षात येईल की, माणूस सहसा कोणतीही गोष्ट सोडायला तयार होत नाही. सत्ता, संपत्ती, पद, अधिकार या अशा गोष्टी आहेत की, ज्या मोहात माणूस अडकतो. हवं असताना सोडणं हे प्रगल्भतेचे लक्षण, काळजी, गरज,


                         जाणिवांची आरास/१५३