पान:ज्योतिर्विलास.pdf/111

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पंचांग. रवि, शक्र, बुध, चंद्र, असा आहे. यांतला प्रथम शनि घेऊन पुढे चवथा चवथा ग्रह पुनःपुनः घेतला म्हणजे सात वार क्रमाने येतात. होरा या संज्ञेचे दिवसाचे २४ भाग करून त्यांचे शून्यादिग्रह क्रमाने स्वामी मानितात. अर्थात् दिवसांत सर्व ग्रह ३ वेळा होऊन आणखी ३ होतात. म्हणजे एके दिवशी पहिल्या होरेचा स्वामी शनि मानिला तर दुसऱ्या दिवशी पहिल्या होरेचा स्वामी रवि होतो. तिसरे दिवशी चंद्र येतो. पहिल्या होरेचा जो अधिप तोच त्या वाराचा स्वामी. याप्रमाणे रवि, चंद्र, मंगळ, हा क्रम प्रथम उत्पन्न झाला. व पृथ्वीवर हल्ली जेथे वार चालतात तेथे हाच क्रम आहे. इतकेच नाही तर आपल्या देशांत आज जो वार तोच पृथ्वीवर आज सर्वत्र आहे. या वारांची नावेही सर्व देशांत बहुधा एकाच अर्थाची आहेत. नक्षत्रांच्या तारा सर्व सारख्या अंतरावर नाहीत, म्हणून क्रांतिवृत्ताचे २७ विभाग मानून त्यांतल्या प्रत्येकास नक्षत्र म्हणतात असें मागे सांगितलेच आहे. प्रत्येक नक्षत्रामध्ये १३ अंश २० कला होतात. इतकें अंतर चालण्यास चंद्रास जो काळ लागतो त्यास नक्षत्र म्हणतात. मध्यम मानाने एक नक्षत्र ६० घटिका ४३ पळे असते. कधी याहून कमजास्त होते, यामुळे वृद्धिक्षय होतात. त्याविषयी नियम तिथीप्रमाणेच आहेत. __पंचांगांत रोजची नक्षत्रे दिलेली असतात ती चंद्राची होत. म्हणजे चंद्र त्या दिवशी त्या नक्षत्राजवळ असतो, असे समजावयाचे. ह्यांस चंद्रनक्षत्रे किंवा दिननक्षत्रे असेही म्हणतात. जसा चंद्र नक्षत्रांतून फिरतो त्याप्रमाणे सर्व ग्रह नक्षसांतून फिरतात. सूर्यास एक नक्षत्र क्रमण्यास १३ किंवा १४ दिवस लागतात. आर्द्रा इत्यादि जी पावसाची नक्षत्रे त्यांस सूर्यनक्षत्रे असेही म्हणतात. सूर्यनक्षत्रे पावसाळी जशी असतात तशी इतर ऋतूंतही असतात. ती पंचांगांत दिलेली असतात. सूर्यास सर्व नक्षत्रांतून फिरण्यास एक वर्ष लागते. पाऊस सूर्यावर अवलंबून आहे. म्हणून ज्या नक्षत्री सूर्य असतां पाऊस पडतो त्यांस पावसाची न-- क्षत्रं म्हणतात. इतर ग्रह कोणत्या नक्षत्री असतात हे आमच्या इकडच्या पंचांगांत लिहीत नाहीत. परंतु इंदुर, ग्वाल्हेर, तेलंगण, मलबार, बंगाला वगैरे प्रांतांतील पंचांगांत लिहितात. अश्विनीपासून विभागात्मक सवादोन नक्षत्रांचा एक राशि असे क्रांतिवृत्ताचे जे १२ भाग त्यांस मेष, वृषभ इत्यादि नांवे आहेत. सूर्याचे एका राशीतन दसया राशीत जे जाणे त्यास संक्रांति किंवा संक्रमण म्हणतात. तो मेष राशीत ज्या वेळी जातो त्या वेळी मेषसंक्रमण होते. याप्रमाणे चंद्रादिकांच्याही राश्यंतरास संक्रमण म्हटले असतां चालेल. चंद्र एका राशीत सुमारे दोन अडीच दिवस असतो. सूर्य एक महिना असतो. कोणाची जन्मराश मेष आहे असे म्हणतात, याचा अर्थ असा की, तो जन्मला त्या वेळी चंद्र त्या राशीत होता. नक्षत्रांवरून राशि किंवा राशीवरून नक्षत्र समजण्याचे कारण वारंवार पडते. म्हणून त्यांचे कोष्टक येथे देतो.