या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरे १९१८ सालची झटापट सन १९१६ च्या आक्टोबर महिन्यांत इंग्लंडच्या मंत्रिमंडळांत फार महत्त्वाची क्रांति झाली. प्रथम लॉइड जॉर्ज यांनी राजीनामा दिला, नंतर अॅस्किथ पदभ्रष्ट झाले, व लॉइड जॉर्ज यांनी मुख्य मंत्र्याची जागा पटकावली. लॉइड जॉर्ज मुख्य प्रधान झाल्यापासून इंग्लंडचे आयलंडविषयक धोरण धड अही नाही आणि तसेही नाहीं अशा तन्हेचे झाले. न्याय, अन्याय, लहर, आणि दंडुकेशाही यांचे विचित्र मिश्रण या धोरणांत दिसावयास लागले. ज्या सिन फेन लोकांना चवकशी न करतां तुरुंगांत टाकळे होते त्या सर्वांना १९१६ च्या डिसेंबर महिन्यांत मुक्त करण्यांत आलें..पण लगेच सन १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यांत धोरण दुस-या दिशेला झुकले आणि टेरेन्स मॅस्विनी, टॉमस मॅक्कर्टिन वगैरे कित्येक सिन फेन पुढान्यांना एकदम पकडण्यांत आले. इतक्यांत एक आयरिश कन्व्हेन्शन भरविण्याची कल्पना लॉइड जॉर्ज यांच्या डोक्यात आली. ही कल्पना जाहीर करतांना त्यांनी असे स्पष्ट बोलून दाखविले, की आयलंडमध्ये कोणत्या प्रकारची राज्यपद्धति असावी याविषयींचा मसुदा तयार करावयास आयरिश लोकांना सांगण्याचे इंग्रज सरकारने ठरविले आहे, व त्यासाठीच ही कन्व्हेन्शन भरविण्यांत येत आहे. या सभेत आयर्लंडांतील सर्व पक्षांच्या व मतांच्या लोकांनी, रेडमंडच्या अनुयायांनी, ओब्रायनच्या पक्षाच्या पुरस्कर्त्यांनीं, आणि सिन फेन पक्षाच्या मंडळींनीही भाग घ्यावा, आणि आयर्लंडमध्ये साम्राज्यांतर्गत स्वराज्य कोणत्या स्वरूपाचे असावें याविषयीं या सर्व मंडळींनी एकमताने एखादी योजना तयार केली तर ती ब्रिटिश पार्लमेंट पुढे आपण सादर करू असे लॉइड जॉर्ज यांनी जाहीर केले.