पान:तरंग अंतरंग.pdf/१००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काहीही ओळख नसताना हा माझा 'परमेश्वर' मला ५०० पाऊंड द्यायला तयार झाला होता. माझी मानसिक ताकद, त्यांच्या शब्दांनीच दुप्पट झाली. सुदैवानं माझी डायरी खिशात होती. आतापर्यंतच्या प्रवासाची खडा न् खडा माहिती त्यात होती. शुक्रवारमुळे पोलिस चौकी बंद होती. पण काही अधिकारी आरामात पाय टेबलावर पसरून बसलेले होते. धाडस करुन डायरीतील माहितीच्या आधारे मी तक्रार नोंदवली आणि त्यांच्याकडून तक्रारीची प्रत घेऊन त्यांचे कोरडे आभार मानून बाहेर पडलो आणि पुन्हा दूतावास गाठले व बसून घटाघटा पाणी प्यायलो. त्यानंतर राजदूतांनी पासपोर्ट दिला व त्यांचे आभार मानून मी बाहेर पडलो. प्रचंड भूक लागूनही काही उपयोग नव्हता. कारण खिशात छदामही नव्हता आणि मी कुणाकडे काही मागणार नव्हतो. तसाच उठून पायी अमेरिकन एक्सप्रेस बँक हुडकून काढली आणि डायरीतील तपशील दाखवून बँकेने मुंबईत दिलेले, न वापरलेले ट्रॅव्हलर चेक्स पुन्हा 'इश्यू' करण्यासाठी अर्ज दिला. मी माझ्या पूर्वीच्या प्रवासात वापरलेल्या चेक्सची पूर्ण माहिती डायरीतून बँकेला दिली. 'पूर्ण तपासणी झाल्यावर चेक्स संध्याकाळी ५ वाजता मिळतील,' असे आश्वासन बँकेने दिले. चेक्स मिळाले नाहीत तर 'क्लॉक रूम'मधील बॅगेज मिळणार नव्हते व हॉटेलमधून 'चेक आऊट'ही करू शकणार नव्हतो. पोटात काही नसतानाही मनोबल वाढले आणि मी 'स्विस एअर'चे ऑफिस हुडकायला पुन्हा तंगडतोड सुरू केली. डायरीतील सगळे तिकिटाचे 'डिटेल्स' दिल्यावर दुसऱ्या दिवशीच्या कैरो - मुंबईचे तिकीट त्यांनी 'इश्यू' केले. तोपर्यंत ५ वाजले होते म्हणून परत अमेरिकन एक्सप्रेस बँकेकडे फरफटत निघालो. बँकेत गेल्यावर वापरलेले चेक सोडून उरलेल्या डॉलरच्या किमतीचे चेक हातात मिळाले आणि मी पुन्हा 'श्रीमंत' झालो. त्यानंतर अगोदर ५० डॉलर्सची लोकल करन्सी घेऊन अधाशासारखा जेवलो. नंतर दिवसभरातील चालण्याचा हिशेब केल्यावर लक्षात आले की, पोटात काही नसताना मी २५ ते २८ किलोमीटर पायपीट केली होती. हॉटेल सोडून दुसऱ्या दिवशी सहीसलामत कैरो एअरपोर्टवर आत जाताना तेथे असलेल्या रक्षकाने हसत सलाम केला. माझ्या लक्षात आले, मी अलेक्झांड्रियाला जायला इथे उतरलो होतो, तेव्हा याच रक्षकाला त्याच्या आवडीची लता मंगेशकर यांची 'अल्बर्ट हॉल' ची कॅसेट मी गप्पा मारता मारता दिली होती. तेव्हा तो भलताच खूष झाला होता. विमानतळावर आत खुर्चीवर आरामात बसलो. तेव्हा समोरच्या बाकावर एक भारतीय जोडपे गळ्यात गळे घालून ओक्साबोक्शी रडत होते. बहुधा माझ्यासारखेच संकट भोगत असावेत, असे वाटून चौकशी केली. तेव्हा त्यांना माझ्या फ्लाईटमध्ये जागा मिळाली नव्हती, असे समजले. तेव्हा (१९८३) कैरो - मुंबई आठवड्यात एकच फ्लाईट असे. जवळ पैसे नसल्याने आठवडा काढणे त्यांना शक्य नव्हते. माझे विमान सुटण्याची वेळ जवळ आली होती, पण त्यांच्यासाठी चहा आणून दिला. माझ्या सामानावर त्यांना लक्ष तरंग अंतरंग / १००