पान:तरंग अंतरंग.pdf/१२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वारल्याची ती तार होती. मी त्याला मिठीत घेतलं. पाठीवरून हात फिरवून म्हटलं, "पाच वाजता बस आहे, निघ तू.” त्यानं आपलं सारंच सामान गोळा केलं होतं. मालकाला भाडं द्यायला त्यानं मला सांगितलं......आणि खाली माना आम्ही घालून एस.टी. स्टँडकडे चालू लागलो. बस दूरवर जाईपर्यंत मी हात हलवत होतो आणि तो हमसून रडत डोळे पुसत होता. खोलीवर परतताना माझे पाय जड, दगड झाले. डोळ्यांपुढून जळके लाकूड हलेचना. अर्थातच, माझ्या दृष्टीनं हा निव्वळ योगायोग होता. पण त्याच्या वडिलांचा मृत्यू मात्र विलक्षण, गंभीर, गूढ होऊन मनात राहिला तो राहिलाच. आयुष्यात पुन्हा सोमनाचे मला कधीही भेटला नाही, ना कधी दोन ओळी त्यानं मला लिहिल्या. सोमनाचेचं काय झालं, हे कधीही न कळल्याची खंत मात्र मनात कायमची घर करून राहिली. रात्री नदीवर जाणं बंद झालं. फक्त एका रात्री मी एकटाच शेवटचं नदीवर जाऊन हातपाय धुऊन, हृदयापासून चितेवरच्या 'त्या' अनोळखी मृतात्म्याला आणि सोमनाचेच्या न पाहिलेल्या वडिलांना हात जोडून नमस्कार करून त्यांच्या आत्म्याच्या चिरशांतीसाठी प्रार्थना करून खिन्न मनानं घरी परतलो. १२५ / तरंग अंतरंग ܀܀܀