पान:तिच्या डायरीची पाने.pdf/४५

हे पान प्रमाणित केलेले आहे.

उणीव भासली. या लहान गांवात मानसशास्त्राचा अभ्यासक सापडणे अशक्यच होते. गावात शासकीय मेडिकल कॉलेज जरूर आहे पण या आडवळणाच्या गावात यायला तज्ज्ञ डॉक्टर्सही फारसे तयार नसतात. त्या शास्त्राची जाण आणि आवड असणारी व्यक्ती 'मनस्विनी'ला सुद्धा हवी होती. शेवटी अनुभव, वाचन आणि गीताला अधिक नेमकेमणानी बोलते करणे, याचा आधार घेतला आणि एक लक्षात आले की गीताला शारीरिक आघात व ताण जाणवला तरी त्या मानाने मानसिक धक्का कमी होता. खेड्यातला गोतावळा गाई, कुत्री, कोंबड्या, बकऱ्या अशांसह असतो. लैंगिक जीवनाबद्दलची गुप्तता, घृणा इ. भावना मानवी कुटुंबातून सहजपणे जोपासल्या जातात. पण खेड्यातील गोतावळ्यात या भावनांना एक सहज छेद आपोआप मिळतो. प्राण्यांचे कामजीवन, जननप्रक्रिया दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणून अनुभवल्या जातात. वाढत्या वयानुसार, आपले जीवन आणि प्राणिजीवन यांतील संगतीचे आढावे अंतर्मनात आपोआप घेतले जातात. त्यातून काही गृहिततत्वे जोपासली जातात. घरातल्या पारंपारिक संस्कारातून स्त्री ही 'देणारी' असते आणि पुरुष हा 'घेणारा' असतो ही भूमिका आपोआप तयार होतेच. अगदी सुशिक्षित, मध्यमवर्गीय स्त्रियाही मुलींबद्दल असाच विचार करतात.
 "ज्याचा माल त्याच्या दारात नेऊन टाकला की आपण मोकळे. कधी करणार लेकीचं लग्न? आमचीचं ठरवून मोकळे झालो आम्ही!" या शब्दात एक शिक्षक बाई. मला टोकत होत्या. मग सर्वसामान्य स्त्रियांबद्दल काय बोलायचं?
 गीताने ती लहान असताना वडिलांचं आईच्या पांघरूणात घुसणं पाहिलं होतं. शारीरिक त्रास मात्र जबरदस्त होता. सुरुवातीच्या काळात नवऱ्याने लाड भरपूर केले होते. त्यामुळे स्त्री पुरुष सहवासाची आवड आणि ओढ निर्माण झाली होती. गप्पांच्या ओघात तिने सारे बोलून दाखवले. जोडीदार तरुण आणि तिच्या भावना जाणणारा असावा अशी तिची अपेक्षा होती. गीताला शेतकामाची भरपूर माहिती होती. आवड होती. शेतकरी संघटनेच्या शिबिरातील अनुभव, बैठकीतून शेतीचे व महिलांचे प्रश्न मांडण्याची सवय यामुळे गीताची जीवनाकडे, कुटुंबाकडे, स्वतःकडे बघण्याची दृष्टी अत्यंत सुजाण आणि संवेदनशील होती.

 ग्रामीण परिसरात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना एक महिन्याचे

४०
तिच्या डायरीची पाने