पान:तीन तत्वज्ञानी.pdf/122

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

नियम घ्या. खोटे बोलून दुसऱ्याला फसविण्याची आपल्याला इच्छा होते. तेव्हां जर खोटें बोलण्याचे तत्व रास्त आहे तर सर्वांनी अशा प्रसंगी खोटे बोलण्यास हरकत नाही असें ठरते. पण असा सार्वत्रिक नियम झाला तर कोणी कोणावर विश्वास ठेवणार नाही. व मग आपलें खोटें बोलण्याचा उपयोग नाही; तेव्हां खोटे बोलण्याची इच्छा म्हणजे अपवादात्मक आहे. आपण मात्र खोटे बोलावें व सर्वत्रांनी खरे बोलण्याचा नियम पाळावा असे आपल्याला वाटते. या विवेचनावरून खोटे बोलणे नैतिक कायद्याच्या विरुद्ध म्हणूनच अनीतीचे ठरते.

 तसेंच एखाद्याला चोरीची इच्छा झाली तर ही वाईट की चांगली ? जर चांगली तर सर्वांनी सर्वांच्या वस्तु न विचारतां घेणं रास्त होइल. पण मग चोरीचा उद्देश नाहीसा होईल. कारण आपल्याजवळ चोरलेली वस्तु कशी राहील? दुसरा आपल्या व न विचारतां ती घेऊन जाईल व न विचारतां घेऊन जाणे यांत कांहीं वावगे नाही असे आपल्या वर्तनाचें तत्व सांगते. पण अशी सार्वत्रिक अदाधुंदीची स्थिति आपल्या विवेकशक्तीला बरोबर वाटत नाही. येथेसुद्धां सामान्य नियम व आपल्यापुरतां अपवाद आपल्याला पाहिजे असतो व म्हणून अशी अपवादात्मक वर्तणुक नैतिक कायद्याविरुद्ध ठरते. आणखी एक उदाहरण घेऊ. एखादा गरजू आपल्याजवळ मदत मागावयास आला तर ती त्याला द्यावी किंवा नाही? आपली स्वार्थी इच्छा म्हणते देऊ नये. पण आपले करणे रास्त असेल तर कोणी कोणास संकटांत मदत करूं नये असा सार्वत्रिक नियम ठरतो. पण असा नियम व्हावा अशी आपली खरी इच्छा नसते. आपण संकटांत असलो म्हणजे दुसऱ्यांनी आपल्या मदतीला यावे असे आपणास वाटते तेव्हां येथे सुद्धा दुसऱ्याला मदत न करण्याची स्वार्थी बुद्धि ही अपवादात्मक असते. म्हणजे आपण मात्र दुसऱ्यास मदत करूं नये, दुसऱ्याने मात्र आपल्या मदतीस धावावें असे आपले आपलपोटेपणाचे वर्तन असते व म्हणूनच आपलपोटेपणा हा नैतिक दुर्गुण ठरतो.

११२