पान:तीन तत्वज्ञानी.pdf/50

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

घेण्याच्या आधीच स्नान केलेले असले म्हणजे प्रेताला स्नान घालण्याचा त्रास बायकामाणसांना पडणार नाही."

 सॉक्रेटिसाचे बोलणे संपल्यावर क्रिटोनें उत्तर दिले, " आपली इच्छा ठीक आहे. पण तुमच्या मित्रांना किंवा मला आपल्या मुलांबद्दल किंवा दुसऱ्या गोष्टींबद्दल काही सांगावयाचे आहे काय ? शेवटी आपल्याकरतां आम्ही काय करावे ?”

 सॉक्रेटिस म्हणाला, " क्रिटो, मी आजपर्यंत जो तुम्हांला उपदेश करीत आलों, त्याप्रमाणे तुम्ही वागलांत, म्हणजे मला सर्व काही मिळाले. तुम्ही आपल्या आत्म्याची योग्य काळजी घ्या, म्हणजे माझी, माझ्या मुलांबाळांची व तुमची स्वतःचीही योग्य सेवा केल्यासारखे होईल. मग तुम्ही आतां मला वचन दिले नाही, तरी हरकत नाही. परंतु जर तुम्ही आपल्या आम्या बद्दल बेपर्वा राहिलां, आणि आज व दुसऱ्याही प्रसंगी वादविवादांत ज्या तऱ्हेच्या आयुष्यक्रमाचे चित्र आपण रेखाटले आहे,त्याप्रमाणे वागला नाही, तर तुम्ही आज दिलेली वचने कितीही लांबलांब आणि मनोभावाने दिलेली असोत, त्यांचा काहीएक उपयोग नाही.”

 क्रिटो म्हणाला, " आपल्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा आम्ही होईल तितका प्रयत्न करूं. परंतु तुम्हांला आम्ही कोणत्या तऱ्हेने पुरावे ?"

 सॉक्रेटिस म्हणाला, " तुमच्या इच्छेनुरूप फक्त प्रथमतः मला तुमच्यापासून दूर जाऊ न देतां धरून ठेवले पाहिजे."

 नंतर सॉक्रेटिसाने हंसतमुख होऊन आपल्या मित्रमंडळीकडे पाहून म्हटले, " मित्रहो ! तुमच्याजवळ बोलणारा व आपली प्रमाणे व्यवस्थेने मांडणारा तो मी सॉक्रेटिस, ही गोष्ट क्रिटोला काही पटलेली दिसत नाही. त्याला वाटते की, लवकरच प्रेत होऊन पडणारे जे माझें शरीर, तोच मी, व म्हणूनच मला कसे पुरावयाचे याबद्दल तो विचारपूस करीत आहे.विष प्राशन केल्यावर मी येथे राहणार नाही, तर भल्या लोकांच्या वस्तीला जाईन, हे सिद्ध करण्याकरतां मी जी प्रमाणे उपयोगांत आणली व ज्या प्रमाणांच्या योगाने तुमचे व माझे समाधान झालें, ती सर्व प्रमाणे क्रिटो