पान:तीन तत्वज्ञानी.pdf/73

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जॉर्ज बार्क्ले

मिळाली. कारण त्याच्या कॉलेजांत तो आधीपासून फेलो होताच, पण परत आल्यावर त्याला अधिक पगाराच्या शिक्षकाच्या जागेवर नेमण्यांत आले. तसेच त्याने इंग्लंडांत असतांना उपाध्यायाच्या धंद्याची दीक्षा घेतली असल्यामुळे त्या कामावरही त्याला नेमण्यांत आले. पण लोककल्याणाची कल्पना त्याच्या डोक्यांत घोळत असल्यामुळे या स्वार्थी आयुष्यक्रमाने व उद्योगांनी त्याचे समाधान होईना. याच वेळी एका मृत्युपत्रान्वयें बरीच मोठी द्रव्याची देणगी त्याला मिळाली. यामुळे त्याच्या लोककल्याणाच्या इच्छेने उचल खाल्ली व आपण बरमुडा बेटांत जाऊन तेथे एक विद्यापीठ स्थापन करावे, असे त्याच्या मनाने घेतले. या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याकरतां आपल्याला मिळालेली सर्व संपत्ति, तसेंच आपल्याला दिलेल्या कॉलेजांतील व धर्मखात्यांतील मानाच्या व फायदेशीर जागाहि सोडण्याला तो तयार झाला. त्याने काही तरुण मंडळीला आपल्या बेताला अनुकूलं करून घेतले व आपल्या भावी विद्यापीठाला सरकारी सनद व सरकारी मदत मिळविण्याची खटपट करण्याकरतां बार्क्ले पुनः इंग्लंडांत आला.

 पहिल्याप्रथम ज्याप्रमाणे स्विफ्टने बार्क्लेला राजदरबारी प्रवेश करवून दिला, त्याचप्रमाणे याहि वेळी त्याने बार्क्लेकरितां खटपट केली. बार्क्लेने आपला विद्यापीठाचा बेत सविस्तरपणे पुष्कळ जणांना सांगितला व त्याने खासगी गृहस्थांकडून पैशाच्या मदतीची आश्वासने घेतली. बार्क्लेच्या वक्तृत्वाने व कळकळीने या बेताला बरेंच स्वरूप आले. त्याने जार्ज राजाची मुलाखत घेतली व राजालाहि ही कल्पना पसंत पडली. मुख्य प्रधान वालपोल हा मोठा धोरणी, मुत्सद्दी व व्यवहारज्ञ होता. त्याला बार्क्लेची कल्पना अव्यवहार्य वाटली; पण राजाचा कल पाहून त्याने आपले विरुद्ध मत दिले नाही. त्याच्या मनाची अशी कल्पना होती, की, पार्लमेंटमध्ये ही योजना पसंत होणार नाही. पण येथे वालपोलची अटकळ फसली. कारण बार्क्लेने फारच खटपट केली. तो प्रत्येक सभासदाला जाऊन भेटला व आपल्या गोड भाषणाने त्याने

६३