पान:तीन तत्वज्ञानी.pdf/79

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जॉर्ज बार्क्ले

वावे, असे त्याच्या मनाने घेतले व आपल्या निश्चयी व उत्साही स्वभावानुरूप कसल्याही अडचणींना न जुमानतां बार्क्लेने आपला निश्चय पार पाडला. आपला बिशपचा हुद्दा कायम ठेवून त्याला नियमाप्रमाणे ऑक्सफर्डला जातां येईना, तेव्हां त्याने ताबडतोब त्या हुद्याचा राजिनामा दिला. पण जार्ज राजाने त्याच्या वयाकडे व विद्वत्तेकडे पाहून त्याच्याकरतां नेहमींच्या नियमाला अपवाद करून बार्क्लेला बिशपच्या हुद्याचा राजिनामा न देतां ऑक्सफर्डमध्ये राहण्याची परवानगी दिली. पण ऑक्सफर्डला येऊन बार्क्लेला फार दिवस झाले नाहीत, तोंच तो एके दिवशी आपल्या कुटुंबामध्ये मुलाबाळांसमवेत बोलत बसला असतां एकाएकी १७५३ मध्ये मरण पावला! अशा तऱ्हेचे सुखाचे मरण येणे फार थोड्यांच्या नशिबी असते.

 बार्क्लेच्या चरित्रापासून त्याचा निश्चयी, उत्साही, सरळ स्वभाव उत्कृष्ट तऱ्हेने दिसून येतो. त्याचे तात्विक विचार आपल्या इकडल्या हरिदासाप्रमाणे प्रपंचापासून अलग राहिलेले नव्हते, तर त्या विचारांचा पूर्ण अंमल त्याच्या वर्तनावर झालेला होता. खऱ्या तत्त्वज्ञान्याप्रमाणे त्याची वृत्ति बनलेली होती. तो मान, पैसा किंवा कीर्ति यांकरितां हपापलेला नव्हता. आपल्या विचारांशी आचाराचे तादात्म्य करणारी माणसें विरळा म्हणून तुकाराममहाराजांनी अशी माणसें वंदनीय आहेत असे यथार्थ उद्गार काढलेले आहेत. त्याच कोटीपैकी बार्क्ले हा तत्वज्ञानी होता.

६९