पान:तीन तत्वज्ञानी.pdf/84

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

ज्ञान होते, त्याप्रमाणे एका प्रकारच्या संवेदनांवरून भिन्न संवेदनांचे आपल्याला ज्ञान होते. हाच बार्क्लेच्या पहिल्या ग्रंथाचा मथितार्थ आहे.

या ग्रंथानंतर लवकरच प्रसिद्ध झालेला बार्क्लेचा दुसरा ग्रंथ म्हणजे 'मानवी ज्ञानावरील ग्रंथ' होय. या ग्रंथांत बार्क्लेने 'जड द्रव्य' 'बाह्य वस्तु' व 'अचेतन सृष्टि' या कल्पनांवरच घाला घातला आहे. ज्याला आपण बाह्य वस्तु म्हणतो, ज्या मानवी मनापासून अगदी भिन्न आहेत असे आपण समजतो त्या वस्तूचे ज्ञान आपल्याला इंद्रियांच्या संवेदनांनी होते. एखादें नारिंग आपण पाहतो, त्याच्या रंगाचे ज्ञान आपल्याला डोळ्याने होते, त्याच्या आकाराचे, त्याच्या मदुपणाचें ज्ञान स्पर्शाने होते, त्याचा सुवास नाकाने कळतो, त्याची रुचि जिभेने कळते. सारांश नारिंगाचे सर्व गुण आपल्याला निरनिराळ्या इंद्रियांनी कळतात. आतां आपली इंद्रिये आपल्या मनांत संवेदना उत्पन्न करतात, म्हणजे आपले बाह्य वस्तूचे सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे, ज्यांना आपण बाह्य वस्तूंचे गुण म्हणतो त्या सर्व संवेदनाच होत. तेव्हां आतां बाह्य वस्तूंचे बाह्यत्व व स्वतंत्र अस्तित्व कोठे राहिले ? कारण समजा, आपण पहात असलेलें नारिंग गुप्तपणे नाहें सें झालें, पण जोपर्यंत आपल्या मनाला रंगाच्या, आकाराच्या, मृदुपणाच्या, सुवासाच्या, रुचीच्या व इतर गुणांच्या संवेदना भासत आहेत, तोपर्यंत ते नारिंग नाहीसे झाले आहे असे आपल्याला कळणारच नाही. अर्थात् पहिल्यापासूनच नारिंग नसले तरी त्याचीहि प्रतीतेि आपल्याला होणार नाही. जोपर्यंत आपल्याला संवेदना होत आहेत तोपर्यंत बाह्य वस्तु आहेच असें आपले मन आपल्याला सांगणार. तेव्हां बाह्य वस्तु म्हणजे संवेदनांचा समुदाय होय. वस्तूचे गुण म्हणजेही संवेदनाच होत. संवेदनाच्या किंवा गुणांच्या पाठीमागे असणारी निराळी आणखी बाह्य वस्तु नाही. तेव्हां बाह्य वस्तूची बार्क्लेच्या मताने खालील व्याख्या ठरते. नियमाने एकत्र राहणा संवेदनांचा समुदाय म्हणजे बाह्य वस्तु होत. बाह्य वस्तूंना मानवी मनाव्यतिरिक्त निराळे अस्तित्व नाही. या दृष्टीने जगांत जड म्हणून पदार्थच नाही असे होते;

७४