पान:तीन तत्वज्ञानी.pdf/86

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

 येथे बार्क्ले पूर्ववयांतील तत्वज्ञान संपले. या तत्वज्ञानाचा हेतु मागे सांगितल्याप्रमाणे आस्तिक्य व धर्मनिष्ठा उत्पन्न करण्याचा होता व बार्क्लेच्या मते तो त्याने बऱ्याच अंशाने साध्य करून घेतला. कारण त्याच्या मते धर्माचा अत्यंत मोठा शत्रु म्हणजे जडवाद होय. सर्व जग-मानवी मनसुद्धां-मूळ जड द्रव्यापासून झाले आहे असें आधिभौतिक शास्त्र म्हणतात. अर्थात् या जगाच्या उपपत्तीमध्ये परमेश्वराला जागाच राहत नाही. असे झाले म्हणजे धर्मनिष्ठा ही अजिबात नाहींशी होते. कारण धर्माचा मूळ आधार जो परमेश्वर तोच जडामध्ये विलीन होतो. बार्क्लेने आपल्या तत्वज्ञानविषयक विचारांनी या आधिभौतिक शास्त्रीय विचारसरणींतील मूळ काटा काढून टाकला. त्याचे म्हणणे असें , मनुष्याच्या अवलोकनशक्तीचे पृथक्करण केले किंवा त्याच्या ज्ञानाचे पृथक्करण केले तर असे दिसून येते की, ज्याला 'जड द्रव्य' "जड आदि तत्व' म्हणतात ती कल्पना मुळांतच विसंगत आहे. सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे. त्या संवेदना चित्स्वरूप आहेत व त्यावरून परमात्मा व जीवात्मा अशी दोन तत्वे शाबीत होतात व जड तत्वाला वावच रहात नाही; नव्हे 'जड तत्व' ही कल्पना अज्ञानमूलक भासते. कारण तिच्या अस्तित्वाला कांहींच प्रमाण दाखवितां येत नाही, तेव्हां अशा अज्ञानमूलक पायावर उभारलेली जडवादाची व नास्तिक्य वादाची सर्व इमारत ढासळून पडते. व मग अर्थात् मनुष्य धर्मपरायण बनण्यास उशीर लागत नाही.

 याप्रमाणे मानवी ज्ञानाच्या पृथक्करणाने जड तत्वाची कल्पना निराधार भासते; तर त्याच पृथक्करणाच्या योगे आपल्या आत्म्याची आपल्याला प्रचीति येते. जर सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे तर अर्थात् या संवेदना अनुभवणारा आत्मा अवश्यमेव असला पाहिजे असा आपत्याला प्रत्यय येतो. तसेंच संवेदना या शाश्वत आहेत, कायमच्या आहेत; त्याचप्रमाणे त्या एकमेकांच्या सूचक आहे; यावरून हे सर्व घडवून आणणारा परमात्मा याच्या अस्तित्वाबद्दल मनाची खातरी पटते.

७६