पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/52

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३२


  १२७. किती उपदेश करावा खळासी । नावडे
तयासी बरें कांहीं ॥ १ ॥ शुद्ध हे वासना नाहीं चांडाळाची ।
होळी आयुष्याची केली तेणें ॥ २ ॥ नाहीं शुद्ध भाव
नाइके वचन । आपणा आपण नाडियेलें ॥ ३ ॥ तुका ह्मणे
त्यासी काय दिला जन्म । करितो बडबड रात्रंदिवस ॥ ४ ॥

  १२८. बोली मैंदाची बरवी असे । वाटे अंतरीं
घालावे फांसे ॥ १ ॥ कैसा वरिवरि दिसताहे चांग ।
नव्हे भाविक केवळ मांग ॥ २ ॥ टिळा टोपी माळा कंठीं ।
अंधारी नेउनि चेपी घांटी ॥ ३ ॥ तुका ह्मणे तो केवळ
पुंड । त्यावरि वाजति यमदंड ॥ ४ ॥

  १२९, भोरप्याने सोंग पालटलें वरी । बक ध्यान
करी मत्स्या जैसें ॥ १ ॥ टिळे माळा मैंद्र मुद्रा लावी
अंगीं । देखों नेदी जगीं फांसे जैसे ॥ २ ॥ ढीवर या
मत्स्या चारा धाली जैसा । भीतरील फांसा कळों नेदी
॥ ३ ॥ खाटिक हा स्नेहवादें पशु पाळी । कापावया नळी
तयासाठीं ॥ ४ ॥ तुका ह्मणे तैसा भला मी लोकांत ।
परी तू कृपावंत पांडुरंग ॥ ५ ॥

  १३०. जळो प्रेमा तैसा रंग । जाये उडोनि पतंग
॥ १ ॥ सासूसाठीं रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ २ ॥
मैंद मुखींचा कोंवळा । भाव अंतरीं निराळा ॥ ३ ॥
जैसी वृंदावनकांती । उत्तम धरूं नये हातीं ॥ ४ ॥ बक
ध्यान धरी । सोंग करून मासे मारी ॥ ५ ॥ तुका ह्मणे
सर्प डोले । तैसा कथेमाजी खुले ॥ ६ ॥ ________________________________________

१ गळा, २ कोळी. ३ सर्प डुलतो परंतु तो विषारी
 तसा खळ कथेमध्यें शोभतो तरी त्याचे
 अंतर्याम काळे कुट्ट असते.