पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/127

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विवेचन करणाऱ्या टीकाशास्त्रीय भूमिकेचा फरक. या समीक्षाशास्त्रात तुम्हालाही रस नाही. चांगली कविता असे समीक्षेचे बांध ओलांडूनच पुढे जात असते.

 मला ‘संकेत', 'रुणझुण', 'थडग्याच्या दगडावर', 'लॉजिक' यांसारख्या कविता फार आवडल्या. ('सोय', 'शिदोरी' यांसारख्या) ज्या कवितांच्यामध्ये एकेरी आक्रोश, नुसता संताप आहे अशा कविता मला आवडल्या नाहीत. काही ठिकाणच्या प्रतिमा अतिशय प्रत्ययकारी आहेत. सगळ्या कवितेला वजन देणाऱ्या, त्यातील अतिशय आवडलेल्या ओळी -

  'हे रान कसं फुलून आलंय! इंद्राच्या मनात पाप भिनावं तसं';

  'देठादेठांतून फुलं सांडावीत। तशी तू अंग झटकून मोकळी';

  'व्यथांच्या नजराण्याचे दान घेताना आयुष्य कसे झोळीसारखे गप्प'

  'सावलीच्या सामावल्यानं। काळोख विस्तारत नाही।'

इत्यादी इत्यादी. अमुक कविता आवडल्या, अमुक आवडल्या नाहीत अशी नोंद करणे यात फारसा अर्थ नाही. यापेक्षा काही निराळे मी तुम्हाला सांगू इच्छितो. कवितेचा आरंभ दोन ठिकाणांहून होतो. उत्कट आणि पृथगात्म-असा अनुभव आणि हा अनुभव व्यक्त करण्यास समर्थ असणारी भाषा व तिची प्रतिमाशक्ती. खरे म्हणजे 'अनुभव' आणि 'भाषा' ही विचाराची सोय म्हणून केलेली विभागणी आहे. व्यवहारात असे विभाजन नसते. कवी जो अनुभव घेतो त्यातच प्रतिमांचा जन्म असतो. त्या कुठून दुसरीकडून येत नसतात. काव्यानुभावाला अंगभूतच असतात. ही दुहेरी संपदा तुमच्याजवळ आहे. सांगण्याजोगे पुष्कळ आहे; ते सांगण्यास समर्थ अशी भाषा आहे. तेव्हा हे जे सामर्थ्य तुमच्याजवळ आहेच त्याबद्दल कोणतेही दुमत नाही. प्रश्न असा की हा कवितेचा आरंभ असतो, शेवट नसतो, याचा अतिशय काळजीपूर्वक विचार जर तुम्ही केला नाही तर तुमची कविता इथेच थांबेल; ती वाढू शकणार नाही. ज्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, नवी झेप घेण्याची क्षमता आहे, त्यांचा विकास जर थांबला तर माझ्यासारख्या रसिकाला ती दु:खाची बाब आहे. यापुढचे विवेचन त्या प्रेमापोटी समजावे. कवींना उपदेश करण्याचा हक्क कुणालाही नसतो.

 मी स्वत: शुद्ध वाङ्‍‍मयीन माणूस नाही. राजकारणावर लिहिणारा, आपल्या मताचे आग्रहाने प्रतिपादन करणारा व प्रचार करणारा मी माणूस आहे. पण कविता ही कधीही व्याख्यानवजा, प्रचारकी असू शकत नाही. व्याख्यानाचे, 'प्रचाराचे, उपदेशाचे एक प्रयोजन असते. तो अपेक्षित परिणाम साधला की मग

कबरीतील समाधिस्थ / १२५