पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/130

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अन्याय × विद्रोह, उदात्त x क्षुद्र, रमणीय x बीभत्स अशी ही द्वंद्वे माणसाच्या जातीत कायमची आहेत. यामुळे एका बाजूने आपण रणागंणावर असतो व दुसऱ्या बाजूने या प्रश्नांच्याकडे सनातन सत्य म्हणून पाहतो. या प्रक्रियेत चिंतनाचा जन्म होत असतो. चिंतन म्हणजे उसन्या विचाराची पोपटपंची नव्हे. चिंतन म्हणजे दिसणाऱ्या सत्याचे अधिक खोल आकलन. म्हणून चिंतनाने अनुभवाची खोली व उंची वाढते. त्याचा व्याप वाढतो. जिथून कवितेचा प्रवास सुरू व्हावा तिथे तुमची कविता समर्थ आहे. ज्या दिशेने कवितेचा प्रवास पुढे चालावा या वाटचालीचे सामर्थ्य तुमच्या ठिकाणी आहे. पुढे विकसित व्हायचे की नाही हा निर्णय तुम्ही घ्यायला हवा. सुर्वे यांच्या पहिल्या संग्रहापेक्षा तुमचा पहिला संग्रह चांगला व दमदार आहे. सुर्वे यांच्या दुसऱ्या संग्रहापेक्षा तुमचा दुसरा संग्रह सामर्थ्यशाली व्हावा या भावनेने मी हे लिहिले आहे. खोटी औपचारिक स्तुती करण्यापासून मी स्वत:ला शक्य दूर ठेवतो, त्याप्रमाणे कोणत्याही गटातील ठरीवपणा व इतर गटांविषयीचा आकस हेही मी दूर ठेवतो.

 अगदी शेवटी एक इशारा: कविता ही फुलाच्या रोपाप्रमाणे असते. ती स्वत:च्या क्रमाने विकसित होते व फुलते आणि या स्वाभाविक विकासाला उपकारक व्हायचे. तिला घाईगर्दीने, सक्तीने फुलविण्याचा हव्यास नसावा. नाही तर काव्य कोमेजून जाते. नामदेव ढसाळ एकीकडे व दिलीप चित्रे दुसरीकडे या दोघांचेही वेगवेगळ्या कारणांमुळे हे झाले आहे.

 पत्र जेव्हा पोचेल तेव्हा पोचल्याचे कळवावे. अधिक कडव्या शब्दांचा राग नसावा. मीही अपूर्ण, सदोष माणूस आहे हे या पत्राचे 'शुद्धलेखन' सांगेलच.

  कळावे,

आपला नम्र

नरहर कुरुंदकर

१२८ / थेंब अत्तराचे