पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/48

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७. चौथे अपत्य


- शरद कट्टी

 माझे मित्र शरद कट्टी यांच्या खेळकर छोट्या कवितांना ही प्रस्तावना लिहिताना मला फार आनंद होतो. एकतर कट्टी हे माझे मित्र आहेत आणि दुसरे म्हणजे या कविता मनाचा विरंगुळा आहे. त्यांत गंभीर असे फारसे काही नाही. कट्टींच्या कवितेत गंभीर असे काहीच नाही असे मात्र नाही. हास्याचे स्वरूपच असे आहे की, त्याला पार्श्वभूमी काही प्रमाणात तरी गंभीर असते. सगळेच हास्य गंभीर पार्श्वभूमीवर निर्माण होत नसते. पण गांभीर्य परिहासाला सर्वस्वी टाळताही येत नसते. गंभीर बाबींचाच पुष्कळदा खेळकरपणे विचार करणे भाग असते. आपल्याकडे 'अति झाले अन् हसू आले' अशी एक म्हण आहे. या म्हणीचे स्वारस्य यात आहे की गंभीर घटना हे विनोदाचे एक उगमस्थान आहे हे आपण मान्य करतो.

 विनोद हा बहुरंगी आणि बहुढंगी असतो. विसंगती, अपेक्षाभंग आणि अतिशयोक्ती विनोदात असतेच. तो जसा काही प्रमाणात सूक्ष्म असतो तसा काही प्रमाणात स्थूल असतो; अतिशय गंभीर घटनांतून निर्माण होतो तसा गांभीर्याच्या अभावातूनही निर्माण होतो. कोट्या जसा त्याचा भाग असतात तसा टीका, विडंबन हाही त्याचा भाग असतो. हास्य असे नानारंगी असल्यामुळेच त्याची नेमकी व्याख्या करता येत नाही. कट्टींच्या विनोदी कविताही अशा विविध प्रकारच्या आहेत. पण त्यांची प्रमुख वृत्ती परिहासाची आहे. विडंबनाची नाही. उपहास आणि उपरोध यांचा या कवितेला अधून मधून स्पर्श होत असला तरी तो या मनाचा स्थायी भाव नव्हे. म्हणून या कवितेला विडंबन कविता असे म्हणणे फारसे बरोबर नाही. जीवनातील अगर वाङ्‌मयातील काही उणिवा व दोष कवीला जाणवतात. त्यात सुधारणा व्हावी म्हणून तो विनोदाच्या माध्यमातून टीका करीत आहे असे या कवितांचे रूप नाही. हा संग्रह म्हणजे विडंबन गीतांचा संग्रह नव्हे. त्याचे स्वरूप पाडगांवकरांच्या वात्रटिकांशी जास्त

४६ / थेंब अत्तराचे