पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/59

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवसायाचे स्वरूपच असे आहे. क्षमता असणाऱ्या क्षेत्रात आला म्हणजे तो आपोआपच थोडा धीट व आत्मविश्वासपूर्ण होत जातो. एक तर वर्गात जाऊन शिकविताना माणूस बोलका होतो, वक्ता होतो व हळूहळू वर्गाच्या बाहेर सुद्धा बोलू लागतो. त्याच्या भोवती चाहते व विद्यार्थी गोळा होऊ लागतात, त्यांचे जीवन आपण घडवितो आहो या जाणिवेने आत्मविश्वास वाढू लागतो, त्या विद्यार्थ्यांना भरपूर मिळावे यासाठी आपण वाचू लागतो, विचार करू लागतो. हा सगळाच प्रकार देशमुखांच्या बाबत झालेला आहे. झगडत झगडत, अपेक्षाभंग, अपयश व निराशा यावर मात करीत, प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर घेत घेत प्रा. देशमुख यांनी आपले जीवन घडविलेले आहे. या सगळ्या विकासाच्या व प्रवासाच्या खाणाखुणा त्यांच्या काही कवितांमधून सुद्धा आपणास सापडू शकतील.

 ही परिस्थितीविरुद्ध जिद्दीने झगडणारी माणसे कधीही खऱ्या अर्थाने आपल्या मनाचा भोळेभाबडेपणा आणि स्वप्नाळूपणा गमावू शकत नाहीत. झगडण्याची जिद्दच त्या स्वप्नाळूपणामुळे येते आणि ही माणसे खऱ्या अर्थाने कधी विफल व निराशही होत नाहीत. भोवतालची परिस्थिती पाहून ती चिडतात, वैतागतात पण निराश होत नाहीत. मला कधीकधी जगाच्या व्यवहारात एक चमत्कारिक विसंगती जाणवते. जी माणसे मनाशी काहीतरी ध्येय बाळगून प्राणपणाने झगडत असतात, ती वारंवार अपयशी होतात पण ती प्रायः निराश होताना दिसत नाहीत. ज्यांना निराश होण्याचा हक्क आहे ती ही माणसे आहेत आणि असे सर्वस्व पणाला लावून जी माणसे कधी झगडलीच नाहीत. ज्यांच्या जवळ सर्वस्व पणाला लावावे असे काही मूल्य नाही ती माणसे बसल्या जागीच हताश, निराश होऊन बसलेली असतात. या माणसांना निराश होण्याचा हक्कच नसतो. ज्याचे निराश होणे आपण समजू शकू ते निराश व्हायला तयार नाहीत. उरलेले का निराश झाले तेच समजत नाही, ही जीवनातील विसंगती आहे पण ती आहे. जे आहे ते आहे. म्हणून मान्य करायला हवे जे समर्थनीय आहे- तेवढेच जर माणसांच्या जगात अस्तित्वात असते तर मग प्रश्न फार सोपे झाले असते. अडचणीचा खरा आरंभच इथून होतो की जे असायला हवे ते उपलब्ध नसते आणि जे नसायला हवे ते संपत नसते.

 अमृत देशमुखांचे मन एका बाजूने ग्रामीण जीवनाशी सांधा असणारे असे मन आहे. ग्रामीण जीवनात बलवान असणाऱ्या परंपरेच्या श्रद्धा त्यांना मान्य नसल्या तरी ज्ञात आहेत. परंपरागत जीवनात जी विषमता आणि अंधश्रद्धा होती तिच्या विरुद्ध देशमुख झगडतील पण याच परंपरेच्या जीवनातून जी

तराणा / ५७