पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/86

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 माणूस एकटा येतो, एकटा जातो. तो जन्मभर एकटा असतो. घरासाठी घर प्रिय नसते, दारासाठी दार लाडके नसते, पुत्रासाठी पुत्र आवडता नसतो तर हे सारे स्वत:साठी असते. अशा एकटेपणाचे वर्णन उपनिषदांनीही केल आहे. पण तो एकटेपणा खरा नव्हे. कारण जेव्हा माणूस मोहात गुरफटलेला असतो तेव्हा त्याला हजार नाती असतात व या मोहातून सुटून जेव्हा माणूस ब्रह्मांशी सांधा जोडतो त्यावेळी सारे विश्वच तो होतो. जणू विश्वातील सर्व जड चेतन तो होतो. अशावेळी नवी अब्ज नाती असतात आणि अब्ज नाती जेथे जिरून गेली तो अंबुजाक्ष आपला सखा असतो. व्यामोहाची सहस्र सुते कापून टाकून निमोहाच्या कोटी सुतांशी सांधा जोडून माणूस एकटा होत नाही तर तो पूर्ण होतो. दु:खी होत नाही तर सुखी होतो. एक नाळ तुटतांना दुसरी समर्थ नाळ जोडली गेली तर मग खरा एकटेपणा जाणवणे शक्य नसते. श्रद्धांचा पट अखंड व घट्ट असला म्हणजे दुःखही गोड होते. मधुर दु:खाचा वाफा संतांना अध्यात्मात सापडला आहे कारण कशासाठी पिसे व्हावे हे त्यांना पक्के माहीत होते.

 आजचे दु:ख निराळे आहे. जन्मत:च जन्मनाळ तुटून जाते. आणि समाजपुरुषांशी नाते जुळतच नाही. समाजपुरुष सोडून विराट पुरुषांशी नाते जोडावे तर तेथे अस्तित्व विरघळून भलामोठा रितेपणाचा डोह दिसतो आणि मग माणूस खरोखरी एकटा होतो. हा सोडता न येणारा एकटेपणा हे नव्या माणसाचे भयाण दु:ख आहे कारण आता माणूस देवाचाही उरला नाही, संमाजाचाही उरला नाही, तो स्वत:चाच उरलेला नाही. बाहेरच्या जगात गुरफटलेले मन गणिकेच्या वस्तीतून काढून घेतलेल्या शरीराप्रमाणे काढून घे आणि आत्म्यात पहा; आत्मक्रीड हो, आत्मरती हो हे सांगणे गीतकाराला सोपे होते कारण बाहेरच्या जगाला पाहणाऱ्याच्या आकलन शक्तीच्या मर्यादा होत्या. आत सर्व ब्रह्मांडाच्या भूत, भविष्य, वर्तमानाचा अर्क असणारा प्रभू होता. पोलादी बाहूंनी बळकटपणे धरून मखमली शय्येवर न संपणारे ब्रह्मसुख भोगविणारा प्रभू आत होता. त्याचा दिव्य मंचक प्रकाशमान होता.

 आजचा. एकटेपणा बुरशीप्रमाणे घेरणारा आणि मडविणारा आहे. बाहेर पाहण्यासाठी काहीच नाही. कारण बाहेरच्या समाजापासून माणूस तोडला गेला आहे. यंत्र संस्कृतीचा आरंभ माणसाच्या सेवेसाठी यंत्र येथून होतो आणि या संस्कृतीच्या परिणत अवस्थेत माणूस यंत्राचा नुसता गुलाम होत नाही. तोही एक यंत्र होतो, पुरा यंत्रही होत नाही. यंत्राचा एक नगण्य भाग होतो. यंत्राप्रमाणे जाणीवशून्य होणे माणसाला शक्य नसते. पण संस्कृतीची चौकट तर त्याला

८४ / थेंब अत्तराचे