पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/89

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झालो आहो असा आक्रोश करणारे खरोखरच श्रद्धाहीन झालेले आहेत का? हाच प्रश्न प्रथम विचारला पाहिजे. कारण खरोखरी जे मन मूल्यविहीन झालेले असते त्याला शारीरिक दु:खाच्या खेरीज इतर कोणती वेदना-स्पर्शच करू शकत नाही. मूल्ये आहेत ती कवटाळल्याविना राहवत नाही आणि बाह्य जगाच्या व्यवस्थेत त्या मूल्यांना स्थानही सापडत नाही. जीवनाला काही अर्थ, कृतार्थता असावी असे तर वाटते पण अर्थ मात्र सापडत नाही. या सीमेवर मागे पुढे होताना जे दु:ख आजच्या कवितेत व्यक्त होत आहे, ते अस्तित्वाच्या परिघाचा विकास करण्यात अपयश आल्यामुळे जाणवणारे आहे.

 जीवनाच्या जीवशास्त्रीय पातळीला अर्थ नसतो. मी का जन्मलो? कशासाठी जगतो? हे प्रश्न उकिरड्यावर शांतपणे चरणाऱ्या गाढवाने कधी विचारले नाहीत, गाई-म्हशींनी विचारलेले दिसत नाहीत. माणूसच हे प्रश्न विचारतो. कारण माणूस मूल्यांचा निर्माता आहे. मूल्यांच्या भोवती विणलेला सृष्टा आहे. मूल्ये चमकणाऱ्या खड्याप्रमाणे नदीच्या पात्रात, उडणाऱ्या पाखरांप्रमाणे कुंजात अगर रानात सापडत नाहीत. ती माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करताना जो व्यथांचा भोग आपण भोगतो त्यात सापडतात. म्हणून श्रेष्ठ वाङ्‍‍मय सर्व देशांत, सर्वत्र वेदनेने आर्द्र झालेले दिसते. ही सापडलेली मूल्ये बाहेरच्या जगात प्रतिष्ठित करताना आपल्या अस्तित्वाचा परिघही वाढतो व जीवनाचा अर्थ ही सापडतो. हा जीवनाचा अर्थ सापडला म्हणजे दुःख संपत नाही, त्याची पातळी बदलते. आणि मग दु:खभोगच एक नवे समाधान देतो. 'पीर मधूर भई' या अवस्थेपर्यंत नेतो.

 'अस्ती' म्हणजे आहे. 'सन्तु' म्हणजे होवो. अशा दोन पायऱ्या आहेत. 'अस्तीच्या' ठिकाणी प्रामाणिकपणे उभे राहून 'सन्तु'च्या दिशेने पसरणारी कविता ही कवीला द्रष्टा ठरवते. पण निदान भ्रमाच्या आवर्तात न सापडता अस्तीच्या पायरीशी उभे राहावे. दिंडी त्या ठिकाणी उभी आहे. 'सन्तु'चा शोध घ्यावा, हे चांगले. म्हणजे दिंडीला दिशा येते. पण निदान प्रत्येकाने आपल्यापुरते अस्तीचे निराळेपण पारखून घ्यावे. न जाणो या प्रयत्नात ‘सन्तु'चा ही शोध लागेल. या दिंडीतील यात्रेकरूंना तुमचा प्रवास सुखाचा होवो असा आशीर्वाद देणेच बरोबर नाही. जे दु:ख आजच्या युगाला जाणवते आहे त्याचा त्याग केल्याशिवाय 'सुख' नाही. व असा त्याग करून दिंडीच्या बाहेर थांबायचे असेल तर मग या युगात जिवंत असण्यालाच अर्थ नाही. दिशा-दर्शक ठरेल तर हे दुःखच. ते तसे दिशा-दर्शक ठरो म्हणजे झाले.

दिंडी / ८७