पान:दानशूर महाराजा सयाजीराव.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 राजवाड्यातील प्रत्येक आर्थिक बाबीसंबंधी महाराजांनी काही नियम केले. नियमबाह्य खर्च करणाऱ्याला कायद्याने शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली. खर्च योग्य कारणांवर होऊ लागला. त्यामुळेही खर्चात बचत झाली. महाराजांनी खर्चात काटकसर केली; याच्या उलट राजवाड्यातूनही उत्पन्न वाढ म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केले. यामध्ये त्यांनी योजलेला एक- एक उपाय पाहिला म्हणजे महाराज खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठी किती आग्रही होते, हे लक्षात येते. जनावरांच्या पायाखालील कचरा, बागांतील गवत, फळे, फुले, भाज्या, प्रत्येक खात्यातून निरुपयोगी होणारे साहित्य अशा सर्वांचा लिलाव करून येणारी रक्कम सरकारमध्ये जमा करण्याची पद्धत सुरू केली. अशा सूक्ष्म नियोजनामुळे राजकोशात कायमच भर पडत राहिली.
महाराणींना बचतीचा सल्ला
 सयाजीराव महाराज स्वतःबरोबर कुटुंबातील इतरांनी बचत करावी यासाठी आग्रही असत. ते नेहमीच कुटुंबातील सदस्यांना बचतीबाबत मार्गदर्शन करत. महाराणी चिमणाबाई यांना एका पत्रातून बचत करण्याविषयी सांगितले. हे पत्र महाराणी चिमणाबाई यांना लिहिले नसले तरी, त्यातून त्यांनी बचत करावी याबद्दल स्पष्टपणे उल्लेख आहे. महाराज या पत्रात लिहितात, 'महाराणींनी त्यांच्यासोबत जास्तीचा स्टाफ व इतर खास व्यक्तींना नेण्याची गरज नाही आणि त्या लोकांनी स्वत:चा खर्च स्वतः करण्याऐवजी तो राज्यावर टाकणे योग्य नाही. मग

दानशूर महाराजा सयाजीराव / १५