या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समजली जायची. अशी शिकलेली बाई धुणी-भांडी करून संसार उपसते हे पाहन सोहनींना त्यांना भरून यायचं. मदत तरी किती करणार? करत राहणंही अवघड. त्यांनी आपल्या मंडळींकडून एक प्रस्ताव ठेवला. “इथं जवळच मिरजेला डॉ. एन. आर. पाठक आहेत, ते मोठे समाजसेवक आहेत. त्यांचं मोठं प्रसूतिगृह आहे. त्यांना वरचेवर नर्स लागतात. तेथे दाईचा कोर्सपण चालतो. सातवी पास बायका घेतात ते." शांताबाई बापटांना सोहनी वहिनींचं म्हणणं पटलं. श्री. सोहनींनी चौकशी केली तर तिथंच राहावं लागणार अशी अट निघाली. शिवाय मुलं घेऊन राहता येणार नव्हतं. मग दोन मुलींची सोय कुठं तर बोर्डिंगात करायचं ठरवलं; पण पैसे फार लागणार म्हणून शेवटी डॉक्टरांच्याच ओळखीनं पंढरपूरच्या नवरंगे बालकाश्रमात ठेवायचं ठरलं. मुली १५ वर्षांच्या होईपर्यंत आश्रमात ठेवायचा बाँड भरला. मुलगा प्रकाश लहान असल्यानं आपल्यापाशीच ठेवायचं ठरवून बापटबाईंनी मिडवाईफ्री नर्सिंगचा कोर्स सुरू केला. डॉक्टरांचा अनाथाश्रमही पण होता. कोर्सच्या वेळी प्रकाशला आश्रमात ठेवलं जायचं. अशा दिव्यातून नर्सिंग पार पडलं अन् रिझल्टच्या आधीच बापटबाईंचा सेवाभाव, कष्ट, प्रामाणिकपणा, पेशंटशी वागणं-बोलणं हेरून डॉक्टरांनी आपल्याच दवाखान्यात नोकरी देऊ केली. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. आणखी काय पाहिजे होतं?
 दोन वर्षे त्यांनी डॉ. एन. आर. पाठक यांच्याकडे नोकरी केली; पण मुलींची ओढ त्यांना गप्प बसू देईना. गेली तीन वर्षे त्यांनी छातीवर दगड ठेवून काढली. कारण मार्गच नव्हता दुसरा. तशात त्यांना पंढरपूरच्या डॉ. काळेच्या हॉस्पिटलमध्ये नर्सची आवश्यकता असल्याचं कहलं. डॉ. काळेंनीही डॉ. पाठकांना गळ घातली. बापटबाई प्रकाशसह पंढरपूरला आल्या. मुली आनंदल्या आणि बाईंचा जीव भांड्यात पडला. हे वर्ष होतं ५८-५९. पुढे त्या ९ वर्षे पंढरपूरला राहिल्या. मुली आश्रमात होत्या; पण डोळ्यांसमोर असल्यानं त्यांचं हवं-नको पाहणं व्हायचं. वयात येणा-या मुली डोळ्यांसमोर वाढलेल्या ब-या हा त्यामागचा त्यांचा विचार.

 मुली मोठ्या होऊ लागल्या तसा त्यांची लग्न, हुंडा, खर्च इत्यादी विचारांनी बापटबाईंना अस्वस्थ केलं. डॉ. काळेच्या हॉस्पिटलमध्ये पगार तुटपुंजा होता. तो खर्चात उडायचा. हातात कधीच राहायचं नाही. म्हणून सरकारी नोकरी मिळते का पाहावी असा विचार मनात आला. त्याच दरम्यान 'सकाळ'मध्ये गारगोटीच्या मौनी विद्यापीठाची जाहिरात पाहण्यात आली. भारत सरकारच्या मदतीनं ग्रामीण विकासासाठी समाजसेवा केंद्र

दुःखहरण/१२६