या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझं रुक्मिणीहरण


 तुम्ही कधी तुरुंगात गेलात?
 कधी भेट दिलीत तुरुंगाला?
 नाही ना?
 तुम्ही भाग्यवान आहात! चुकूनसुद्धा जाऊ नका. माणसानं जायची ती जागा नाही. पण काय करू? मला मात्र जावं लागलं. मुद्दाम नाही गेलो. कसा गेलो ते माझं मलाच कळलं नाही. अन् तुरुंगात गेल्याला पण चारपाच वर्षं उलटून गेलीत... अजून किमान तितकी तरी घालावीच लागणार... प्रयत्न आहे शिक्षा कमी व्हावी... मला 'माणूस' म्हणून जगायची प्यास आहे. तसा मी काही हैवान नाही... नव्हतो ही! पण 'त्या' क्षणी मी 'माणूस' राहिलो नव्हतो हेही तितकंच खरं आहे. निदान आज तरी तसं वाटतंय.
 त्याचं असं आहे की, आता तुमच्याशी काय लपवून ठेवायचंय? अन् लपवायला राहिलंच काय आहे माझ्याकडे? माणूस एकदा का नागडा झाला... मग त्यानं निकर घातली. काय नि सूट... सारं व्यर्थ असतं... गौण ठरतं.

 तसा मी रूढ अर्थाने ‘सुशिक्षित आहे. मुंबई विद्यापीठातून बी. एस्सी. झालेला मी. मूळचा पनवेलचा. सुभाना येशू बोराडे. हल्ली वय वर्षे ३५. सध्या एका मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगतोय... गावाचे नाव नाही सांगत... उगीच मग तुम्ही ‘दया' दाखवत भेटायला याल. मला त्या ‘दया' ह्या शब्दाचा अलीकडे तिटकारा येऊ लागला आहे. माणसं कुत्र्याच्या

दुःखहरण/४३