या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खडा लावला... पण राग काही आवरता नाही आला त्या दिवशी... घोटाळा सारा त्या रागाचाच.
 मी विठ्ठलचा खून करू शकलो असतो... पण विचार केला... आपलं नाणं खोटं. दुस-याला दोष देऊन काय उपयोग? एक दिवस तिनं मला झिडकारलं... परत परत झिडकारलं... मी पुरुष असून विनवण्याच करत राहिलो... पुरुष असून म्हणजे स्त्रीला कमी नाही लेखत... पण स्त्रीचा आदर करूनही... तिच्यावर मी बलात्कार करायचं टाळायचो... तिच्या कलानं, घ्यायचो... वाटायचं, तिनं पण माझ्या कलानं घ्यावं... पण हळूहळू लक्षात आलं की माझा मोठेपणा तिला बुळा वाटू लागला... गोडीत राणी म्हणायचो... ती सरकार म्हणायची... पण राज्याला दृष्ट लागली. विठ्ठल अस्तनीतला निखारा निघाला... नुसतं चारित्र्याच्या संशयावरून खून नाही केला... हा सूर्य अन् जयद्रथ करूनही... जरासंध वठला नाही... धड परत चिकटत राहिलं अन् मी पशू झालो... माणूस नावाचा पशू... माणूस म्हणून रहाणारा, वागणारा... तुमच्या लेखी पशू,... माणूस नावाचा पशू, हैवान!
 निकालपत्रात लिहिलंय... भारतीय दंड संहिता कलम ३०२ खाली गुन्हा सिद्ध होत असल्याने... सदोष मनुष्य वधाचा गुन्हा... जन्मठेप व रू. .. दंड... दंड न भरलेस... इतकी आणखी शिक्षा... दंड भरलाय... शिक्षा कमी झालीय.... तरी किमान चौदा वर्ष तुरुंगात काढावीच लागणार आहेत...
 तुम्ही तुरुंगात नाहीत ना आलात? खरंच भाग्यवान आहात... एकदा का तुम्ही कायद्याच्या चौकटीत गुन्हेगार झालात की तुमचं जगच बदलून जातं... जीवन बदलतं...

 ज्या दिवशी रुक्मिणीचा खून केला... तिला तिचा विठ्ठलच हवा होता याची खात्री झाल्यावर... मी पळून नाही गेलो... कांगावा नाही केला... ओरडत रडत होतो... पुरुषासारखा पुरुष असून बाईसारखा रडत होतो... तो एक वाराचा क्षण सोडला तर मी मनुष्य होतो... माझी चूक कळाली. पण... बूंद से गयी... हौज से कहाँ भरेगी? अलीकडे रोज हौद उपसतो हो पश्चात्तापाचा... एकच इच्छा आहे... सुधारायची... सिद्ध करायची संधी द्या!

दुःखहरण/४५