या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मी शिरोळचा. नववी पास. मंडळी सातवी पास. दोन मुलींवर मी थांबायचं ठरवलं होतं; पण मंडळींचा हट्ट... मुलगा पाहिजे... वंशाला दिवा हवाच. हा सचिन झाला १९८७ साली. नव्वद उजाडलं तरी ब्र काढेना. म्हणून डॉक्टरना दाखवलं... तेव्हा माझं पनवेलला पोस्टिंग होतं. डॉक्टरांनी एक पत्र दिलं, आलियावर जंग इन्स्टिट्यूट, बांद्रा, मुंबई... तपासणी करून घ्या म्हणाले. संस्था बघूनच मला भरून आलं... आजूबाजूला सर्व मुलं-मुली मुकी... बहिरी... पाल चुकचुकली... तरी धीर धरून तपासणी केली... श्रवणदोष आहे; पण प्रयत्न केला तर हळूहळू ऐकू येईल... थोडं थोडं बोलू लागेल, असं तिथल्या डॉक्टरबाईंनी समजावल्यावर धीर आला...
 त्यांनी सांगितल्यावरून मी सचिनला रुचिराम थडानी मूक-बधिर विद्यालय, चेंबूरमध्ये घातलं. दरम्यान मी पनवेलहून माहीमला ट्रान्सफर करून घेतली. रोज बायकोचा नि माझा खटका उडायचा तो सचिनवरून. ‘घे तुझा वंशाचा दिवा... पाड आता जगभर प्रकाश' ... ती बिचारी निमूट सारं ऐकायची नि पोरीपेक्षा सचिनवर माया करत राहायची. पोरी पण भावाला जीव लावायच्या... काळजी घ्यायच्या. त्या शाळेत सचिनला चांगल्या बाई भेटल्या. भाग्यश्रीताई त्यांचं नाव... आज लक्षात येतं की, त्या बाईंचं पूर्ण नाव कधी आम्ही विचारलंच नाही...शाळा पालकसभा घ्यायची... सगळ्या विद्यार्थ्यांच्या आयाच पालकसभेला यायच्या... मीच एकटा बाप असायचो... बायकांत पुरुष लांबोडा वाटायचो; पण मंडळी अडाणी आणि मी चार बुकं जादा शिकलेला... गावोगावचं पाणी प्यालेला... मला या साच्या अनुभवानं अधिक शिकवलं... शहाणं केलं. भाग्यश्रीताईंनी एकदा मला समजावलं, “काका तुम्हाला वाटतं म्हणून सचिन लगेच बोलणार नाही. दहा वर्षं तर लागतील.' ऐकून मी डोकं धरून अक्षरशः जमिनीवर बसलो... बाई चांगल्या होत्या; त्यांनी मला धीर दिला... सांगितलं, “तुम्ही स्वतः मुके व्हा... बोलता येत नाही, असं समजा नि त्याला जे शिकवायचं आहे ते पहिल्यांदा तुम्ही शिका. नुसत्या शाळेनं मूल बोलणार नाही. पालकांचे प्रयत्न हवेत. हे टीमवर्क आहे." हळूहळू घरच्यांनी पण माझ्या फे-यांत हात धरला नि सचिनचे ओठ हलू लागले.

 ‘कोशिश करनेवालों की हार नहीं होती हे ट्रकच्या मागं लिहिलेलं वाक्य वाचलं नि माझा जीवन बदलला. कोणीतरी सांगितलं म्हणून मी मी संजीवकुमार नि जया भाद्रीचा ‘कोशिश' पाहिला... त्या चित्रपटानं मला भावसाक्षर केलं. मी स्टॅमिना वाढवत गेलो... सचिनला शिकवत राहिलो.

दुःखहरण/६५