या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रगाड्यात व्यक्तिगत लक्ष पुरवणं... मला भावनिक होऊन चालणार नव्हतं.. “दोन दिवसांनी या. मी विचार करतो.' म्हणून त्यांना परत पाठवलं; पण त्या दोन दिवसांत सचिन काही मनातून जायला तयार नव्हता...
 मी पूर्ण विचार करून त्याला घराजवळ ज्युनिअर कॉलेजला पाठवायचं ठरवलं. जयसिंगपूरचं एक ज्युनिअर कॉलेज माझ्या परिचयाचं... ऐकण्यातलं होतं. तिथल्या प्राचार्यांना सर्व समजावलं. ते ज्युनिअर कॉलेज हायस्कूल अटॅच होतं... ते सचिनला वरदान ठरलं नि सचिन बारावी झाला.
 काळे परत २००७ मध्ये जूनच्या मध्यास सचिनसह दत्त. आता बॉल माझ्या कोर्टात असा येऊन पडला होता की, परतवणं शक्य नव्हतं. मी सचिनला त्या दिवशी दत्तक घेतलं. काळेना म्हणालो, “तुम्ही आता निवांत राहा, नोकरी करा, संसार बघा. मी सचिनला ‘साहेब' करूनच तुमच्या हवाली करीन."
 सचिनला मी आर्टसला प्रवेश घे म्हटलं तर 'कॉमर्स' म्हणून त्यानं जजमेंटच देऊन टाकलं. आमच्या कॉलेजचं साधं वसतिगृह होतं म्हणून त्याला हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्डच्या वसतिगृहात प्रवेश दिला, तर म्हणाला ‘मी इथंच राहणार.' फी माफीचा अर्ज भर म्हटल्यावर स्कॉलरशिप मिळते की, म्हणून मला त्यानं ऐकवायला कमी केलं नाही... तो प्रत्येक बॉलला माझा क्लीन बोल्ड करत राहिला, तसा मी त्याच्या प्रेमात पडत गेलो... शिक्षक, मुलं सर्वच सचिनची काळजी घेत... आमच्या महावीर महाविद्यालय, कोल्हापूरचे आम्ही विचारपूर्वक विकसित केलेलं वैशिष्ट्य होतं... आमच्याकडे जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील अपंग, अंध, अनाथ मुलं शिकत होती... त्यांना सर्व सोयी आम्ही आऊट ऑफ वे जाऊन देत असू. सचिन पहिलाच मूक-बधिर... पण त्याला प्रयत्नपूर्वक बोलता यायचं... यंत्रानं चांगलं ऐकायचा... सर्वांत मोठी गोष्ट होती त्याची समज, शहाणपण, संयम, जिद्द... या सर्वांसाठी हॅट्स ऑफ!

 एफ.वाय.बी.कॉम... ए.टी.के.टी.... एस.वाय.बी.कॉम... ए.टी.के.टी... प्रत्येक वेळी अकौंटन्सी राहायची... एकदा मी सचिनला केबिनमध्ये बोलावून विचारलं... “प्रत्येक वेळी अकौंटन्सी का राहतं रे? लक्ष दे... ट्यूशन लाव...' तर याचं उत्तर... ‘‘राहात नाही सर, मी गॅप घेतलाय अकौंटन्सीचा... ऑक्टोबरला सुटणार सर...' सचिनचा आत्मविश्वास... त्याला आत्मविश्वासाचं नोबेलच द्यायला हवं...

दुःखहरण/६७