या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळेल... ते आता काम करू शकतील, असं आम्हाला वाटत नाही... ट्राय टू अंडरस्टैंड असं...
 हे घरी राहू लागले तसे विचित्र झाले... वेडे नाही... पण सरळही नाही... झोपून राहायचे... सगळ्या सोसायटीच्या भिंती लिखाणाने भरायच्या... तरी बरं पेन्सिलनेच लिहायचे... रोज कॉलेजहून आलं की, लहान मुलासारखं खोडरबर घेऊन पुसत राहायचं... सोसायटीवाले... शेजारीपाजारी सोशिक. काही बोलायचे नाहीत; पण त्यांचा सारा व्यवहार न बोलका बोलका असायचा...
 आता माझी नोकरी अनिवार्य, अटळ बनली होती... मला शेअर करायलाही कोणी नव्हतं... माझ्याकडे सगळं होतं.. रूप, गुण, स्वभाव, कौशल्य, जीव लावणं... करणं, देणं, घेणं... पण आपलं माणूस तेवढे आपलं नव्हतं... माणूसच कशाला... घरचीदारची कोणीच माझी नव्हती. एकटेपण... तणाव... कामाच्या वाढत्या जबाबदाच्या... घर, मंडई, वाणी, धूणी, भांडी, आल्या-गेल्याचं करणं... ‘बाई होणं म्हणजे गुलाम होणं वाचलं होतं... आता मीच तशी झाले होते... म्हटला तर कसलाच त्रास नाही... सुख तर कशातच नाही... फक्त श्वासोच्छ्वास म्हणजे जगणं... मरण येत नाही म्हणून जगणं.. मी टकळीसारखी फिरत राहायचे माझ्याभोवती... गती होती; पण स्थित्यंतर नव्हतं. याचं कुणाला सोयरसुतकही नसायचं.
 वर्षभरात सासरे गेले... एक त्रास कमी झाला. दुस-या वर्षी सासूबाईपण त्यांच्यामागोमाग गेल्या. त्यांचं त्यांच्या पतीवर खरंच प्रेम होतं... दोघांनी त्रास नाही दिला; पण स्वीकारलं नाही... मुली आल्या की कानावर पडत राहायचं... करते बरीक सर्व पण वळण नाही... आपली चव नाही... देवाधर्माचे वेड नाही... उरक आहे; पण उसंत नसते... दिवसभर भुतासारखं बसायचं... टी.व्ही., चॅनल, फोन, पुस्तकं, खाणं-पिणं सगळं करते... सगळं देते पण मूल होऊ देत नाही.

 ऐकून संताप यायचा... वाटायचं तोंड फाटकी व्हावं... डॉक्टरांचं सर्टिफिकेट तोंडावर फेकून मारावं नि सांगावं... पंढ पोरगा जन्माला घातला... माझं वाटोळं केलं... पण आश्रमानं मला संयम, सभ्यता, सदाचार शिकविला होता... सिस्टर मला रोज... प्रसंगानं संस्कार देत राहायच्या... मन दुखावणं, हिंसा... रागानं बोलणं पशू होणं, सेवा हाच धर्म... मी बाप्तिस्मा घेतला नव्हता... फादरनीही दिला नाही. लोकांना

दुःखहरण/७७