हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १४४ ]

रितात. हीं पंखें आपल्या दिवाणखान्यांत शोभे करितां लावण्याची साहेबलोकांनीं चाल पाडिली आहे. मुंबईस चिकाचे पडदे करून त्यांजवर हिरवा रंग देऊन विकतात. असले पडदे आजपर्यंत चीन देशांतून येत असत परंतु आलीकडे जपान व जर्मनी या दोन देशांतून येऊं लागले आहेत. जर्मनी बद्दल खात्रीलायक बातमी मिळत नाहीं; परंतु असें ह्मणतात कीं चिकाचे पडदे तयार करून त्यांजवर जपानी तऱ्हेची नक्षी काढून ते जपान देशांतलेच आहेत असें दाखवून जर्मन व्यापारी इंग्रज लोकांस हा माल विकतात. हें कौशल्य आमच्या लोकांनीं घेण्यासारखें आहे. आमच्या देशांत बांबू पुष्कळ आहेत; बुरुडही पुष्कळ आहेत; व चिताऱ्यांचाही तोटा नाहीं, तेव्हां एखाद्या शहाण्या व्यापाऱ्यानें ओबड धोबड पडदे न करितां हेच सुरेख होतील अशी तजवीज केली, आणि त्यांजवर आमच्या देवादिकांची चित्रें काढिली तर त्यांस गिऱ्हाइकें पुष्कळ मिळतील. चांगला पडदा दृष्टीस पडल्यावर तो विकत घेऊन आपल्या दिवाणखान्यांत टांगणार नाही असा साहेब विरळा. याच प्रमाणें पुष्कळ जातीच्या गवताच्या टोपल्या, कुरकुल्या, परड्या, वगैरे सुरेख जिनसा तयार करून साहेबलोकांस विकतां येतील.

 बंगाल्यांतही वेताचे पेटारे तयार होतात. पूर्वी जुनी दफतरें ठेवण्या करितां झापी या नांवाच्या एका प्रकारच्या बुरडी टोपल्या बंगाल्यांत करीत असत. कलकत्त्याजवळ डायमंड हारबर नांवाच्या गांवीं ताडाच्या पानाच्या करंड्या करीत असतात. ह्या करंड्या चिनई व जपानी धरतीच्या आहेत. कलकत्त्याच्या आसपास खजूरीच्या पानांच्याही करंड्या करूं लागले आहेत. खजूरीची कोंवळीं पानें काढून आणून सुकविलीं ह्मणजे तीं मऊच राहतात, व त्यांजवर तकतकी येते. मोंगीर येथेंं साहेब लोकांच्या टेबलांवर ठेवण्या करितां लहान लहान सुरेख चटया करितात. त्या "शिकी" " सर ” किंवा “ मुंज ” या नांवाच्या गवतांपासून करितात. याच गवतांच्या लहान लहान मुशोभित करंड्या दर्भंगा येथील ब्राह्मणांच्या बायका करितात. त्या विकत मिळत नाहींत.

 वायव्य प्रांतांत हिमालयाच्या पायथ्याशीं असलेल्या बाहारिक गांवीं मुंज गवताच्या करंड्या क्वचित होतात. त्यांजवर कवड्या बसवून नक्षी करण्याची वहिवाट आहे.

 पंजाबांत व मध्यप्रांतांत गवताचे वगैरे काम विशेष होत नाहीं. जयपुरास वाळ्याच्या करंड्या, डबे, वगैरे किरकोळ सामान होतें.