हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १६८ ]

गळपट्टे इत्यादि किरकोळ पदार्थही पुष्कळ होतात. उंटाच्या पोटाखालच्या केंसाचे चोगे होतात.

 पंजाब व राजपुताना या प्रांतीं बोकडाच्या व उंटाच्या केंसाचे थैले, जाडेंकापड, तरट, दोरखंड इत्यादि पदार्थं करितात. पंजाबांत व नेपाळ देशांत बोकडाच्या केसांच्या चवाळी करून त्यास रंगीबेरंगी सुताच्या आंचळ्या लावतात.

मिश्र ( गर्भसुती वगैरे ) कापड.

 मुंबईइलाख्यांत व त्याचे आसपास गर्भसुती कापड ह्मणजे रेशमी व सुती कापड, अमदाबाद सुरत, येवलें, पूणें, विजापूर, कलादगी, बेळगांव, बऱ्हाणपूर, औरंगाबाद, नागपूर, इत्यादि पुष्कळ ठिकाणीं होतें. गर्भसुती लुगडीं व खण याशिवाय मश्रु, इलायची, सुसी व लुंगी हेही पदार्थ या इलाख्यांत होतात. त्यांत लुंग्या कराची, हैदराबाद, शिकारपूर, ठाठा, इत्यादि ठिकाणीं विणितात.

 बंगाल्यांत गर्भसुती कापड पुष्कळ ठिकाणी होतें त्यांत 'टसर' रेशीममिश्रित कापडाबद्दल बांकूरा व मानभूम या दोन जिल्ह्यांची विशेष प्रसिद्धि आहे. हें कापड सुमारें सव्वा रुपयानें वार मिळतें. बांकुरा येथें रंगविलेले रेशीम व रंगविलेलें सूत एकत्र विणून एका कापडाचे कापड तयार करितात, त्यास 'अस्मानी' असें ह्मणतात. पांढऱ्या गर्भसुती कापडास 'बाफूता' असें नाव आहे. हें विशेषें करून भावलपूर जिल्ह्यांत होतें. रंगपूर जिल्ह्यांत जूट व रेशीम एकत्र विणून स्त्रियांकरितां एका प्रकारचें कापड विणतात त्यास 'मखली' असें नांव आहे. डाका येथें सूत व मुगा नांवाचें रेशीम यांचे उभ्या दोरव्याचें कापड विणतात. त्याला 'अजीझुल्ला' किंवा 'अत्रीजी' असें ह्मणतात. मालडा जिल्ह्यांत पुष्कळ प्रकारचें गर्भसुती कापड तयार होतें त्यांत 'सिराजा' ह्मणून एक प्रकार आहे तो इराण देशांतील सिराज शहरापासून उत्पन्न झालेला आहे असें ह्मणतात. सिराजा या कापडाचेही पुष्कळ प्रकार आहेत. साधा सिराजा यांत पांढऱ्या व किरमिजी रंगाचे मिश्रण असतें; मच्छलीकांटा यांत पांढऱ्या भूमीवर नारिंगी पटे असतात; लाल सिराजा, यांत तांबड्या भुयीवर मच्छलीकांट्याचे पटे असतात; अस्मानी सिराजा, यांत हिरव्या व जांबळ्या रंगाच्या मिश्रणाच्या भुयीवर पट्टे असतात, सबूजी कटार,हें कापड हिरव्या रंगाचें असून त्यांजवर तांबडे, व उभे आडवे पट्टे असतात इतकेंच नाहीं तर त्या पट्ट्यांच्या मधून म-