या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १५ ]

लोकांस एका तऱ्हेवरून दुसऱ्या तऱ्हेवर, दुसरीवरून तिसरीवर सारखा झुलवीत ठेवितो.

शिल्पकलेसंबंधीं नकसकाम व नमुने.

 शिल्पकलेच्या संबंधाने लागणारें नकशीचे काम आपल्या देशांत कमजास्त मानानें घरोघरीं आहे. परंतु तें करण्याकरितां प्रथमतः नमुने तयार करून ठेवण्याची चाल विलायतेहून आपल्याकडें आली आहे. घर बांधण्याला लागण्यापूर्वी त्याचा नकाशा तयार करविण्याची रीत आम्हांमध्ये पूर्वी नव्हती, ती आलीकडे पडूं लागली आहे. या रीतीस अनुसरून कामावर आम्ही 'मेस्त्री' नेमूं लागलों आहों. आम्हीं ज्या लोकांस हल्ली मेस्त्री ह्मणतो, ते इंग्रजी इंजिनियर लोकांच्या हाताखाली किंवा इंग्रजी रीतीप्रमाणे शिकलेल्या आमच्या लोकांच्या हाताखालीं काम केलेले असतात, त्यामुळेंं त्यांस इंग्रजी तऱ्हेची नक्षी करण्याचें वळण सहजी लागलेलें असते. हेच लोक किंवा यांच्या संसर्गानें दूषित झालेले लोक आमची घरें बांधीत असतात, त्यामुळें आमच्या घरावर इंग्रजी नक्षी व देशी नक्षी या दोहींचें कडबोळें झालेलें दृष्टीस पडतें. ही सळ भेसळ करण्याची खोड कोठपर्यंत पोंचली आहे हे खालींल मजदार चुटक्यावरून सहज समजेल.

 दोन वर्षांपूर्वीं सरकारी कामानिमित्त आह्मीं अमदाबाद शहरी गेलो होतो त्या वेळेला तेथील एका नवीन घराचा कारखाना पाहण्याकरितां गेलो. त्या घरास लागणाऱ्या तुळयांस नक्षीचे खोदीव काम कांहीं सुतार करीत होते. ही नक्षी एका ब्रान्डीच्या बाटलीवरचा छाप पुढें ठेवून त्याप्रमाणे हुबेहुब काढलेली होती. ती पाहून पोटांत खवळून आलेंं. व तेथींल मेस्त्र्यास आह्मीं सहज प्रश्न केला कीं, "आपली जुन्या तऱ्हेची नक्षी टाकून असली तुम्ही कां बरें घेतां ?" तेव्हां तो मोठ्या डौलानें ह्मणाला " मग आमची अक्कल ती काय ? आम्हीं ही नवीन नक्षी काढली आहे." हें ऐकल्यावर आम्हीं शांतपणे त्याला सांगितले, "शेटजी, ही नवीन नक्षी कांहीं नवी नाहीं, ती बरान्डीच्या बाटलीवरून येथें आली आहे.” हे ऐकतांच मेस्त्रीबोवाचें तोंड खरकन उतरलें. व पुढें ते बोलेनासे झालेंं. असल्या प्रकारचा नवीनपणा दाखवून आमच्या घरांचा खराबा न करतां आमचे मेस्त्रीलोक पूर्वीच्याच नमुन्यांकडे विशेष लक्ष देतील तर फार बरें होईल. मेहेरबान ग्रोस साहेब असें ह्मणतात कीं,