या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १६ ]

"हिंदुस्थानांतील शिल्पकला लयास जाण्यास याच देशांतील श्रीमंत लोक कारण आहेत. ज्या लोकांचें साहेबलोकांशी दळणवळण आहे ते जुन्या तऱ्हेच्या घरांत राहण्यास कंटाळून नवी घरे बांधण्याकरितां हजारों रुपये खर्च करितात. आणि तें काम इंजिनियर कालेजमध्ये शिकलेल्या लोकांकडेस सोंपवितात इतकेंच नाही तर एखादें सरकारी हपीस किंवा आसपासची एखादी लष्करांतील "बराख" त्यांस दाखवून एकसाहा हुकूम बजावितात की, आम्हांस बांधविणे आहे तो राजमहाल असाच उठला पाहिजे." मेजर म्यांट म्हणून मुंबईत एक मोठे कामदार होते. त्यांनी बडोदें येथील नवीन सरकारवाडा व हायस्कूल वगैरे इमारतीचे 'प्ल्यान' काढले. हे साहेब हिंदुस्थानांतील जुन्या नक्षीकडे फारच लक्ष देत. आपल्या हाताखालील मेस्त्री लोकांस देशी नक्षीच काढतां येण्याकरितां त्यांनी पुष्कळ ठिकाणी फिरून जुन्या इमारतीवरील नक्षीचे नमुने काढून ठेविले आहेत. त्यांतील कांहीं मुंबईतील चित्रशाळेत पाहण्यांत येतात. मुंबईतील मेजर म्यॉन्ट प्रमाणें मद्रासेस मेहेरबान चिझोल्म साहेब आमच्या शिल्पकलेचे पूर्ण भोक्ते आहेत. हल्लीं बडोदें येथील दरबारी कामावर ते मुख्य आहेत. भावनगरास मेहेरबान प्रॉक्टर सिम या नांवाचे इंजिनियर आहेत. तेही आमच्या शिल्प कलेस असाच मान देतात. मुंबईतील चित्र शाळेवरील मुख्याधिकारी मेहेरबान ग्रिफिथूस साहेब यांच्या हातून 'प्ल्यान' तयार करून घेऊन सिम साहेबाने भावनगरच्या ठाकूर साहेबांकरितां छत्री या नांवाची इमारत बांधविली आहे. या इमारती करितां तयार करविलेंले संगमरवरी दगडांवरील कांहीं खोदीव काम कलकत्ता येथील प्रदर्शनांत सन १८८३ सालीं पाठविलें होतें. या कामाबद्दल सदरील प्रदर्शन कमेटीकडून चांदीचा बिल्ला देण्यात आला होता. परदेशस्थ लोक अशा रीतीने आमच्या देशांतींल शिल्पकलेविषयी काळजी घेत असतां, आमी बराकी सारख्या भिकार इमारतींचे अनुकरण करावें व आमच्या देशांतील एका उत्तम प्रकारच्या कौशल्याची आपल्याच हातानें नासाडी करावी या परता मूर्खपणा दुसरा कोठेंं असेल काय ? घरे बांधण्यास लागणाऱ्या दगडावरील खोदीव काम राजपुतान्यांत फार चांगलें होतें. जयपूर येथील डाक्तर हेन्ले असें ह्मणतात कीं "दगडावरील कोरींव काम राजपुतान्यांतच चांगले होते. व त्यांत जयपूर येथील इन्जिनियर कर्नल जेकब यांच्या नजरेखालीं तें तर फार सुरेख होतें. या शहरीं आलबर्ट हाल या नांवाच्या