हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ३० ]

दिलीच आहे. हे लोक मातींचे हुबेहुब पुतळे करितात.त्याचप्रमाणे कृष्णागर येथें जदूनाथ पाळ व त्याच्या घराण्यांतील आणखी एक दोन पुरुष हेंच काम करीत असतात. पुण्यांतील सखाराम सोनार व मारुती गुरव यांच्या हातीं चित्रें मोठी प्रसिद्ध आहेत. जदूनाथ पाळ यास इंडिया सरकारचा आश्रय मिळाल्यामुळे त्यानें कलकत्ता व लंडन प्रदर्शनाकरितां मिळून एकंदर तीनशें साडे तीनशें मोठाले पुतळे तयार केले त्यामुळें त्याचा हात इतका बसून गेला आहे कीं, मनुष्याचा चेहेरा एकदा पाहिल्याबरोबर तो हुबेहुब प्रतिमा उतरतो. कलकत्ता येथील चित्रशाळेवरील माजी मुख्याधिकारी यांचे असें म्हणणें असे की, कृष्णागर येथील चित्रकार आपण केलेल्या पुतळ्यास खरोखरीचे कपडे व केंस लावून त्याच्या पोटांत व हातापायांत पेंढा भरून ते आपल्या कामाचा बिघाड करितात. मुंबई येथील चित्रशाळेवरील मख्याधिकारी मेहेरबान ग्रिफिथ्स साहेब यांचे पुण्यातील चित्रांबद्दल असें म्हणणें आहे कीं, त्यांत नैसर्गिकपणा व एतद्वेशीय लोकांचें हुबेहूब स्वरूप हीं उत्तम प्रकाराने दर्शविलेली असतात. व पुण्याच्या चित्रांत खरोखरी कपडे घालण्याची चाल सर्वत्र प्रसिद्ध आहे. या दोन्हीही मुख्याधिकाऱ्यांची मतें कशीहीं असोत. केवळ मातीच्याच कामावर हस्तकौशल्य दाखवावयाचें असेल तर अंगावर कपडे वगैरे न घालतां नुसती मातीच वापरावी हें बरें. व अमक्या प्रांतांतील लोक कसे असतात, ते कपडे कोणत्या प्रकारचे वापरतात या गोष्टींचें ढळढळीत दिग्दर्शन करावयाचें असेल तर खरोखरीचे कपडे व केंस वापरणे हे चांगले. हे कपडे कातरून शिवण्यांत व डोक्यावरील केंसास वेणीचा किंवा बुचड्याचा आकार देण्यांतही पुष्कळ कौशल्य लागते. तसेंच लहान लहान झोंपडी करणे, कारागीर लोकांच्या हत्यारांचे नमुने करणें, मज़र लोकांच्या हातांत देण्याकरितां लागणाऱ्या टोपल्या वगैरे करणें, यांतही कुशलपणा लागतोच. बंगाल्यांत कृष्णागर शहरचे चित्रकार जातीचे कुंभार आहेत. पुण्यांत हा धंदा मूळ जिनगर लोक करीत असत. हल्लीं त्याचा कांहीं नेम नाहीं.अजूनही गणपतीच्या, गौरीच्या, हरितालिकांच्या, खंडोबाच्या वगैरे मूर्ति बहुतकरून जिनगरलोक करितात. बंगाल्यांत कुंभारलोक चित्रें करितात खरे परंतु तीं रंगविण्यास चिताऱ्याकडे पाठवितात व त्यानंतर बेगड वगैरे चिकटविण्याकरितां तींच चित्रें माळीलोकांकडे पाठवावीं लागतात. तसें पुण्यांत करीत नाहींत. आमचे जिनगर किंवा चितारीलोक 'अथ' पासून ' इति ' पर्यंत सगळें काम स्वतःच करितात. कलक-