हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ६८ ]

आहे. कालिका पुराणांत सोन्याच्या भांड्यांत जेवलें असतां वात, पित्त व कफ यांचा नाश होतो व दृष्टी साफ होते असें लिहिले आहे. रुप्याच्या भांडयानें पित्ताचा नाश होतो परंतु वात व कफ हीं वाढतात. तांब्याच्या भांड्याचा उपयोग केला असतां बुद्धि वाढते. परंतु रक्त व पित्त यांचा प्रकोप होतो. पितळेच्या भांड्यांनी कफाचा नाश होतो परंतु ती ऊष्ण आहेत व त्यांच्यामुळें वात वाढतो. लोहचुंबकाच्या भांड्यांमुळे जलत्वक्* कामीण ( कावीळ ) व पंडु रोग यांचा नाश होतो. लोहचुंबकाशिवाय इतर दगडांचीं व मातीचीं भांडी अशुभ मानली. आहेत. लांकडाचीं भांडी शक्तिवर्धक, तेजोद्दीपक व विषविकारनाशक अशीं मानली आहेत."

 वैदिक व पुराणिक कालाच्या अलीकडे म्हणजे बौद्ध धर्माची प्रवृत्ति झाली त्या वेळीं धातूंची भांडी सर्व देशभर वापरीत असत याबद्दल लेख जिकडे तिकडे सांपडतात. या हिंदुस्थानदेशांतील वापरावयाचीं घरांतील भांडी धातूंची असतात. यूरोपखंडांत अजूनही मातीचीं व कांचेचीं भांडीं वापरतात. अलीकडे तिकडे द्रव्यसंचय झाल्यामुळें चांदीचीं भांडीं प्रचारांत येऊं लागलीं आहेत इतकेंच नाही तर बऱ्याच ठिकाणीं सुवर्णपात्रेंही दृष्टीस पडतात.

 पितळेचीं व तांब्याचीं भांडीं पुष्कळ उपयोगांत आहेत त्यामुळें त्यांचे आकार किती प्रकारचे आहेत याचें स्वतंत्र वर्णन करण्यास एक ग्रंथ लिहावा लागेल. ह्यांतील कांहीं आकार भोपळ्यासारख्या झाडाच्या फळापासून घेतले आहेत. उदाहरणार्थ तुंबी. कांहीं भोंवरी व कमळासारख्या फुलापासून घेतले आहेत; उदाहरणार्थ-पडघीचा प्याला, तबक. काही जनावरांच्या शिंगापासून घेतले आहेत; उदाहरणार्थ कर्णा. प्रत्यक्ष भोपळे, पानें वगैरे यांचा अजूनही उपयोग होत आहे. आमचे सन्याशी लोक धातूंचीं भांडी टाकून भोपळ्याचा कमंडलू वापरतात. केळीची पानें, करमळाची पानें, पोईसराचीं पानें व वड, फणस इत्यादि पानांच्या पत्रावळीही आमच्या वापरण्यांत आहेत. खड्गपात्राचा व गव्याच्या शिंगाचा देवपूजेंत उपयोग होतो. देवाचीं भांडीं तांब्याचीं असावींत असा पुष्कळांचा समज आहे तरी पितळेचीं भांडीं पुष्कळ लोक वापरतात.


* जलोदर या रोगानें पोटांत पाणी होतें. त्याप्रमाणें जलत्वक् या रोगांने सर्व शरीरावर असलेल्या त्वचेंत पाणी होतें. या रोगास मराठींत साधारणतः आपण सूज म्हणतो. परंतू सूजेचे प्रकार अनेक आहेत. म्हणून तो शब्द येथें वापरला नाहीं.