हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ७३ ]

ची भांडी मुद्दाम करविल्या शिवाय होत नाहींत. या दोन शहरीं होत असलेले चांदीच्या तारेचें काम मोठें वर्णनीय आहे, परंतु त्यास मजुरी फार पडत असल्यामुळें व तें तारेच्या दागिन्याप्रमाणें युरोपियन लोकांच्या उपयोगीं पडण्यासारखे नसल्यामुळें त्यांस गिऱ्हाईक नाहीसें झाले आहे. मुर्शिदाबादेसही चांदीचें काम होतें. चितागांग येथें चांदीचे काम होतें असें सर जार्ज बर्ड वूड साहेब ह्मणतात. खडकपूर, दरभंगा, रांची व बोद या गांवी होत असलेल्या चांदीच्या माशांची बाबू त्रिलोकनाथ मुकरजी बरीच स्तुती करितात.

 काश्मीर, कच्छ, व जयपूर या देशी संस्थानांत सोन्यारुप्याचें काम करणारांस तेथील दरबारांतून मदत मिळत असल्यामुळे या तीन ठिकाणी रहाणाऱ्या सोनारांस अकरावा गुरु लागला आहे असें ह्मटले तरी चालेल. यांतील काश्मीर व कच्छ येथील सामानाबद्दल मजकूर वर आहे. आतां जयपूर येथील कारागिरीचें वर्णन करूं. जशी कच्छ व काश्मीर या प्रांतांची कीर्ति पूर्वापार आहे तशी जरी जयपूरची नाहीं, तरी तेथील महाराज व दिवाण बाबू कांतिचंद मुकरजी हे डाक्टर हेंन्डली साहेब व मेहेरबान जेकब साहेब यांच्या विचारानें वागून विलायतेस उपयोगी पडणारा माल काढवूं लागले आहेत त्यामुळें अलीकडे जयपूरचें नांव सोन्यारुप्याच्या भांड्याच्या व्यापारांत पुढें येऊं लागलें आहे. कलकत्ता प्रदर्शनांत जयपूर येथील चित्रशाळेवरील अधिकारी पूर्णचंद्र बाबू हे आले होते. त्यांनी कच्छ येथील भांडी खरेदी केलीं तेव्हांच आह्मी त्यांस सांगितलें कीं आतां असलें काम जयपुरास होऊं लागेल व पुढें लंडन येथील प्रदर्शनांत त्यांजकडून त्या-त्या प्रकारचा माल आलाही होता. ही गोष्ट आमच्या पुण्याच्या हुशार कारागिरांनी व दक्ष व्यापाऱ्यांनी लक्षांत ठेवण्यासारखी आहे. हल्लींच्या प्रदर्शनांत पुष्कळ माल आला आहे तेव्हां आम्हीच काय ते शहाणे, पुण्यांत काय ती अक्कल हुशारी वाढली गेली आहे, हा वृथाभिमान ज्यांस झाला असेल त्यांनी तो सोडून चांगले चांगले नमुने खरेदी करावे व त्याची नक्कल उठविण्याची सुरवात करावी अशी आमची त्यांस विनयपूर्वक सूचना आहे.

 टोकें येथेंही चांदीची भांडीं होतात. जयपूरच्या दरबाराप्रमाणें अलवारच्या दरबारींही सोनार ठेवून चांदीचीं व रुप्याचीं भांडीं करविण्याची सुरवात झाली आहे.    १०